Weekly Sadhana- साप्ताहिक साधना

  • Home
  • India
  • Pune
  • Weekly Sadhana- साप्ताहिक साधना

Weekly Sadhana- साप्ताहिक साधना weekly sadhana is weekly magazine in marathi.
(1)

मिलिंद बोकील यांच्या मुलाखतींचा संग्रह 'बोधाचा जोडला तारा'मिलिंद बोकील यांचे आणखी एक पुस्तक आले...ललित व ललित-वैचारिक सा...
03/11/2025

मिलिंद बोकील यांच्या मुलाखतींचा संग्रह 'बोधाचा जोडला तारा'

मिलिंद बोकील यांचे आणखी एक पुस्तक आले...

ललित व ललित-वैचारिक साहित्यप्रकारांत विपुल व सकस लेखन करणारे मिलिंद बोकील यांच्या विविध सात व्यक्तींनी घेतलेल्या दीर्घ मुलाखतींचे संकलन व संपादन करून *बोधाचा जोडला तारा* हे एकसंध पुस्तक तयार झाले आहे. साधना प्रकाशना कडून आलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन 29 ऑक्टोबर 2025 रोजी , एका छोट्या व अनौपचारिक कार्यक्रमात झाले. हा कार्यक्रम पुणे येथील साधना कार्यालयात झाला. अंजली जोशी यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. रेखा इनामदार साने, नीरजा, सुजाता देशपांडे, वंदना बोकील-कुलकर्णी, कीर्ती मुळीक, अंजली जोशी व विनोद शिरसाठ यांनी या मुलाखती वेगवेगळ्या निमित्ताने घेतल्या होत्या. हे सातही संवादक आणि निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या पुस्तकाची पार्श्वभूमी सांगणारे प्रकाशकीय निवेदन विनोद शिरसाठ यांनी लिहिले आहे, ते इथे प्रसिद्ध करीत आहोत.

लिंक :
https://www.kartavyasadhana.in/view-article/vinod-shirsath-on-bodhacha-jodala-tara

साधना प्रकाशनाचे नवे पुस्तकबोधाचा जोडला तारामिलिंद बोकीलसंपादन : अंजली जोशीमिलिंद बोकील यांची ललित व ललित वैचारिक या दोन...
29/10/2025

साधना प्रकाशनाचे नवे पुस्तक

बोधाचा जोडला तारा
मिलिंद बोकील

संपादन : अंजली जोशी

मिलिंद बोकील यांची ललित व ललित वैचारिक या दोन्ही लेखन प्रकारांत मिळून दोन डझनांपेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या दोन्ही प्रकारच्या साहित्याच्या निमित्ताने बोकील यांच्या दोन दीर्घ मुलाखती रेखा इनामदार - साने व विनोद शिरसाठ यांनी गेल्या वर्षी घेतल्या होत्या, त्या 15 ऑगस्ट 2024 च्या साधना साप्ताहिकाचा विशेषांक म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या. शिवाय, मागील दशकभरात मिलिंद बोकील यांच्या अंजली जोशी, नीरजा, वंदना बोकील - कुलकर्णी, सुजाता देशपांडे, कीर्ती मुळीक यांनी विविध नियतकालिकांसाठी किंवा कार्यक्रमांत (एकूण सहा) मुलाखती घेतल्या होत्या. वरील सर्व मुलाखतींमधील प्रश्न व उत्तरे एकत्र करून, त्यातील पुनरावृत्ती वगळून, काही प्रश्न उत्तरे नव्याने समाविष्ट करून तयार झालेले हे एकसंध पुस्तक आहे.
______________________________________

"साहित्याची सगळ्यात मोठी ताकद त्याच्या संदिग्धतेमध्ये आहे. निसंदिग्ध, उघडं करून, सगळं स्पष्ट करून सांगणं ही साहित्याची पद्धत नाही. लेखक संदिग्धपणे सांगणार. ते प्रतीत होणं, समजणं आणि त्यात जे स्पष्टपणे म्हटलेलं नाही तेसुद्धा जाणवणं; ही प्रक्रिया वाचकांच्या मनात होणार. ती पूर्णत्वाला गेली की, त्याचा आनंद खूप मोठा असतो."

"साहित्य आणि सामाजिक जाणीव या परस्परविरोधी गोष्टी नाहीत... सामाजिक जाणीव ही साहित्याची सहज, सुलभ अशी सहचारिणी आहे. त्यामुळे एकाच मनात त्या सुखाने नांदू शकतात. दुराग्रही, झापडबंद विचारांचं साहित्याला ओझं होतं, पण सामाजिक जाणिवेचं नाही."

"समाज पुरेसा मोकळा, आधुनिक आणि उदारमतवादी पाहिजे; तर मग साहित्य बहरून येऊ शकतं. समाज अस्मितावादी, स्वकेंद्री, संकुचित आणि आतल्या आत बघणारा झाला, तर त्याचा साहित्यावर विपरीत परिणाम होईल."

- मिलिंद बोकील

पृष्ठे 240 (हार्ड बाउंड), किंमत 350 रुपये, सवलतीत 280 रुपये (टपाल खर्च वेगळा)

संपर्क साधना प्रकाशन
431, शनिवार पेठ, पुणे 30
Ph. 020 24459635/Mob. 7058286753 [email protected]


संपादकीय  साधनाचा 75 वा दिवाळी अंकसाधना साप्ताहिकाचा पहिला अंक 15 ऑगस्ट 1948 रोजी निघाला, तेव्हापासून गेली 77 वर्षे हे स...
19/10/2025

संपादकीय

साधनाचा 75 वा दिवाळी अंक

साधना साप्ताहिकाचा पहिला अंक 15 ऑगस्ट 1948 रोजी निघाला, तेव्हापासून गेली 77 वर्षे हे साप्ताहिक अखंड प्रकाशित होत आहे. मात्र साधनाचा पहिला दिवाळी अंक 1951 मध्ये निघाला, त्यामुळे साधनाचा हा 75 वा दिवाळी अंक आहे. या पाऊण शतकातील साधना दिवाळी अंकांमध्ये वेगवेगळे बदल होत गेले, ते बदल अंतरंग व बहिर्रंग या दोहोंमध्ये होते. मात्र त्या सर्वांचा गाभा समान राहिला आहे, समाजाभिमुख राहिला आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवरील ललित-वैचारिक लेखन साधनाच्या नियमित अंकांमध्ये प्रसिद्ध होत आले आहे, मात्र दिवाळी अंकांमध्ये ललित साहित्याचे प्रमाण सुरुवातीपासून साठाव्या वर्षापर्यंत जवळपास अर्धे राहिले. त्यात कथा, कविता, कादंबरी यांचा समावेश होता. गेल्या पंधरा वर्षांत मात्र ललित साहित्याचा मजकूर साधना दिवाळी अंकांतून कमी होत गेला आहे. त्याचे एक कारण ललित साहित्य प्रसिद्ध करणारे अनेक दिवाळी अंक गेल्या काही वर्षांत वाढलेले आहेत, दुसरे कारण साधनाची ठळक ओळख ललित-वैचारिक स्वरूपाच्या लेखनासाठीच आहे. परंतु, तिसरे कारण अधिक महत्त्वाचे आहे. ते म्हणजे, 60 व्या वर्षापासून साधनाने बालकुमार दिवाळी अंक, तर 65 व्या वर्षापासून युवा दिवाळी अंक प्रकाशित करायला सुरुवात केली. म्हणजे गेली सतरा वर्षे बालकुमार दिवाळी अंक आणि गेली बारा वर्षे युवा दिवाळी अंक नियमितपणे प्रकाशित होत आहेत. त्यामुळे साधनाच्या वर्गणीदार वाचकांना गेल्या एक तपापासून दरवर्षी साधनाचे तीन दिवाळी अंक वाचण्याची सवय झाली आहे. आणि आम्हीसुद्धा दिवाळी अंकांचे नियोजन करताना तिन्ही अंकांचा एकत्रित विचार करतो. त्यातील आशय व विषय निवडताना, त्यातून विविध समाजघटकांचे प्रतिबिंब पडेल असा विचार केलेला असतो. शिवाय वर्षभरात साधनाचे पाच-सात तरी विशेषांक किंवा मिनी विशेषांक येतात, ते विशिष्ट थीम घेऊन काढले जातात. साहजिकच वर्षभरातील सर्व 48 अंकांचा विचार केला तर साधनातील वैविध्य बरेच जास्त असल्याचे जाणवेेल.

अशा पार्श्वभूमीवर, या वर्षीच्या तीन दिवाळी अंकांकडे पाहायला हवे. या वर्षी बालकुमार दिवाळी अंकामध्ये प्रेमचंद यांच्या पाच (उर्दू, हिंदी) कथांचे अनुवाद प्रसिद्ध केले आहेत, हे सर्व अनुवाद चंद्रकांत भोंजाळ यांनी केले आहेत. त्या सर्व कथांच्या केंद्रस्थानी बालकुमार वयोगटातील मुले-मुली आणि त्यांचे भावविश्व आहे. आजपासून शंभर वर्षांपूर्वी (म्हणजे 1925 दरम्यान) लिहिल्या गेलेल्या या कथा आहेत. आता त्या सचित्र वाचताना वाचकांच्या मनात आपापल्या आयुष्यातील जुन्या स्मृती ताज्या होतील, अंगावर रोमांच येतील. शंभर वर्षांपूर्वीच्या या कथांमधील समाजजीवन वरवर पाहता आता बरेच बदललेले दिसेल, पण भारतातील विविध प्रांतांत आणि जगाच्या कानाकोपऱ्यांत असे समाजजीवन अगदी किरकोळ बदल वगळता आजही पाहायला मिळेल. शिवाय त्यातील मानवी भावभावना आणि प्रवृत्ती-अपप्रवृत्ती आजही सर्वत्र दिसताहेत. प्रेमचंद यांच्या लेखनातील सार्वत्रिकता व कालातीतता या मूल्यांची प्रचिती इथे अनुभवायला मिळते. युवा दिवाळी अंकांत गेल्या सहा वर्षांपासून विविध क्षेत्रांतील कर्तबगार युवांच्या दीर्घ मुलाखती प्रसिद्ध केल्या जातात. या वर्षीच्या युवा अंकात नेहा सिंह राठोड (कवी, गायक), करण सिन्हा (समाजकार्य), सिद्धेश साकोरे (शेती), शर्वरी देशपांडे (गायिका, अभिनेत्री), अजिंक्य कुलकर्णी (उद्योग) या पाच युवांच्या मुलाखती आहेत. त्या केवळ युवाच नाही तर कोणत्याही वयोगटातील वाचकांच्या कक्षा रुंदावणाऱ्या आहेत.

आणि या मुख्य दिवाळी अंकात दहा लेख आहेत. त्यांचे ढोबळमानाने दोन विभाग करता येतील. पहिल्या विभागामध्ये चार लेख-मुलाखती दाखवता येतील. त्यात सानिया कर्णिक या युवतीने लिहिलेला लेख आहे. तिने गेल्या वर्षी साधनाच्या युवा दिवाळी अंकात व मुख्य दिवाळी अंकात आणि नंतरच्या तीन अंकांत असे पाच लेख लिहिले, ते सर्व चीनमधील समाजजीवन आणि तिची भ्रमंती यासंदर्भात आहेत. तीच साखळी पुढे घेऊन जाणारा तिचा लेख या अंकात आहे. चीनविषयी एका बाजूला भारतीयांच्या मनात राग असतो आणि त्याच वेळी चीनच्या प्रगतीविषयी कुतूहल असते, त्या संदर्भात गजानन जोशी यांनी लिहिलेला लेख चिनी भाषा आणि चिनी कार्यसंस्कृती याबाबत मननीय आहे. ‌‘अरेबियन नाइट्‌‍स‌’ हे पुस्तक रिचर्ड बर्टनमुळे अख्ख्या जगाला माहीत झाले आहे, जगभरातील सर्व प्रमुख भाषांमध्ये त्याचे अनुवाद झालेले आहेत. त्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाला या दिवाळीत पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने राम जगताप यांनी लिहिलेली त्या पुस्तकाच्या निर्मितीची कहाणी मराठी वाचन व्यवहारावर आणि ग्रंथ व्यवहारावर वेगळा प्रकाश टाकणारी आहे. कालच्या 15 ऑगस्टला साधना साप्ताहिकाने ‌‘भूमिका‌’ नाटकावर विशेषांक काढला, त्या नाटकाचे लेखक क्षितिज पटवर्धन यांची दीर्घ मुलाखत या अंकात आहे. सिनेमा-नाटक क्षेत्रातील त्यांच्या वाटचालीवर दृष्टिक्षेप टाकणारी ही मुलाखत, त्यांच्याविषयीचे कुतूहल काही प्रमाणात शमवेल आणि मोठ्या प्रमाणात वाढवेल.

दुसऱ्या विभागामध्ये सहा लेख-मुलाखती दाखवता येतील. मागील तीन दशके सखोल व वैशिष्ट्यपूर्ण लेखन करणाऱ्या अतुल देऊळगावकर यांनी पर्यावरण व विकास यांच्यासंदर्भात पत्रकारिता करणाऱ्या दोन मुलाखती (रोली श्रीवास्तव व जोयदीप गुप्ता) व एक लेख (आरती श्यामल जोशी) यांचे संयोजन केले, आणि ते उत्तम प्रकारे अंमलात आणले. त्यामुळे तीन वेगवेगळ्या डिजिटल माध्यमांचा अनोखा परिचय या अंकातून होतो आहे. या तीन लेखांना जोडणारे आणखी तीन लेख दाखवता येतील. त्यामध्ये हेरंब कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष भ्रमंती करून पारधी समाजाच्या स्थिती-गतीचा घेतलेला शोध महत्त्वाचा आहे. नुकतेच निधन झाले, त्या प्रमोद कुलकर्णी यांच्या सामाजिक कार्याची नेमकी वाटचाल दाखवणारा लेख मिलिंद बोकील यांनी लिहिला आहे, तो सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे. आणि सामाजिक संस्थांना मोठे आर्थिक पाठबळ देऊन तळागाळातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या फोर्ड फाउंडेशनमधील कामाचे अनुभव आणि त्यातून आकाराला आलेले आकलन, या संदर्भातील अजित कानिटकर यांचा लेखही मननीय आहे.

अशा या दोन्ही विभागांतील मिळून 10 लेख/मुलाखती वाचकांना जरा जास्तीचा निवांत वेळ काढून वाचावे लागतील. प्रत्येक लेख वाचून झाल्यावर मनात उमटणारे तरंग वेगवेगळ्या प्रकारचे असतील. दिवाळीच्या आनंदात संमिश्र भावना जागवणारे असतील. त्यातील काही लेख अंतर्मुख करायला लावणारे आहेत, काही लेख बदलाची ऊर्मी जागवणारे आहेत, काही लेख कृतिप्रवण होण्याची इच्छा उत्पन्न करणारे आहेत. अशा या अंकाच्या निर्मितीला साधना कार्यालयाचे सहकारी, लेखक, हितचिंतक, वाचक, जाहिरातदार इत्यादी अनेक घटकांचे साहाय्य नेहमीप्रमाणेच लाभले आहे. त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद आणि दिवाळीच्या शुभेच्छा...!

#दिवाळी2025

साने गुरुजींच्या कर्मभूमीत  अमळनेर, पारोळा, चाळीसगाव येथे वाचन प्रेरणा दिना निमित्त  कष्टकरी, रिक्षा चालक - मालक, बस चाल...
19/10/2025

साने गुरुजींच्या कर्मभूमीत अमळनेर, पारोळा, चाळीसगाव येथे वाचन प्रेरणा दिना निमित्त कष्टकरी, रिक्षा चालक - मालक, बस चालक - वाहक यांना तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या कार्यवाह दर्शना पवार व युवा सहकारी धिरेद्र रावते यांनी साधना बालकुमार दिवाळी अंक भेट दिला..

#बालकुमारदिवाळी

15 ऑक्टोबर  : वाचन प्रेरणा दिन..यावर्षीचा साप्ताहिक साधनाचा बालकुमार दिवाळी अंक बालकुमारांसाठी मेजवानी ठरणारा आहे. वाचणा...
15/10/2025

15 ऑक्टोबर : वाचन प्रेरणा दिन..

यावर्षीचा साप्ताहिक साधनाचा बालकुमार दिवाळी अंक बालकुमारांसाठी मेजवानी ठरणारा आहे. वाचणारी मुले दिवाळी अगोदरच दिवाळी साजरी करतील इतका तो अप्रतिम झाला आहे. एकच साहित्यिकांच्या कथांचा दिवाळी अंक असणे ही वेगळी गोष्ट आहे. ज्या वाचकांनी प्रेमचंद यांच्या बालकथा यापूर्वी वाचल्या आहेत ते या अंकातील कथा आवडीने वाचतील. ज्यांनी प्रेमचंद यांच्या बालकथा वाचलेल्या नाहीत त्यांची उत्सुकता वाढवणारा व त्यांच्या इतर कथांवाचण्यासाठी प्रेरित करणारा हा अंक आहे , असा विश्वास वाटतो. भारतीय पातळीवरील प्रेमचंदांसारखे मोठे साहित्यिक बालसाहित्याचा कसा विचार करत होते व लिहीत होते हे समजून घेण्यासाठी हा अंक उपयुक्त आहे.

या कथां वाचत असताना काही वेळा त्या साने गुरुजींनीच लिहिलेल्या आहेत असे वाटते. साने गुरुजींच्या साहित्यातून पाझरत असणारे प्रेम, करुणा आणि वासल्य या कथांमधून जाणवते, हे त्या पाठीमागचे कारण आहे. साने गुरुजी ज्याप्रमाणे भावभावनांना हात घालतात आणि वाचकाला दुःखी , कष्टी, वंचित व्यक्तींच्या दुःखाच्या तळापर्यंत पोहोचवतात तसेच या कथांच्या बाबतीतही घडताना दिसते. साने गुरुजींच्या लेखनातील तरलता या कथांमध्ये आहे. माझा हेतू दोन लेखकांची तुलना करावयाचा नसून समान धागा सांगणे हा आहे.

चंद्रकांत भोंजाळ यांनी केलेल्या सहज सुंदर अनुवादाने कथांच्या निवेदामधील तरलता अलगद पकडली आहे. त्या सहजतेमुळेच या कथा अनुवादित आहेत असे कोठेही जाणवत नाही. बालविश्वातील भाव, अनुभव आणि नातेसंबंध अचूक टिपलेले आहेत. मूळ लेखक आणि अनुवादक या दोघांकडूनही ते काम चोखपणे पार पाडलेले आहे. त्यामुळे या कथा भारताच्या कोणत्याही प्रांतातील वाचकांना आपल्याच परिसरात घडणाऱ्या कथा आहेत असे वाटेल.

मराठीमध्ये अलीकडच्या काळात अशा कथा अपवादानेच वाचावयास मिळतात. ठरवून उपदेश करण्याची भूमिका न घेता लिहिलेल्या या कथांमधून वास्तवाची मांडणीच अशाप्रकारे केलेली आहे, की वाचकांना आपोआपच विचार करत करत सत्यापर्यंत पोहोचतो. जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी लिहिलेल्या या कथा आजही ताज्या टवटवीत वाटतात, हे प्रेमचंदांचे यश आहे. कितीही मोठे झालो तरी प्रत्येकाच्या आत एक लहान मूल असतेच. त्या लहान मुलास जपणे, त्याच्यासोबत राहणे सर्वांनाच जमते असे नाही. जे लोक मोठे होऊनही बालपण जपतात तेच इतक्या छान कथा लिहू शकतात. बालवयात आसपास घडणाऱ्या घटना, आलेले अनुभव , त्याचा बालमनावर ठसलेला प्रभाव मोठेपणीही तसाच राहतो. ते नेमकेपणाने टिपून अभिव्यक्त होणे म्हणजे काय, हे या कथा मधून उमगते.

ईदगाह वगळता बाकी कथांचे निवेदन हे प्रथम पुरुषी आहे. या कथा वाचत असताना आपण आपलीच कथा वाचत आहे असे वाटत राहते. ईदगाह ही कथा शाळेत असताना कोणत्या ना कोणत्या वर्गात मराठी माणसांनी अगदी संक्षिप्त रूपात अभ्यासली आहे. ती संपूर्ण कथा या पुस्तकात वाचताना विशेष आनंद देते. समोर बसून कोणीतरी आपल्याला कथा सांगत आहे असे या कथा वाचताना वाटत राहाते.

प्रेमचंद यांच्या बालपणीच्या आठवणींचा ठेवा कथारूप घेऊन आला असावा असे वाटते. शालेय विद्यार्थ्यांनी प्रसंग , अनुभव लिहावेत आणि हळूहळू गोष्ट लेखनात सुरुवात करावी अशी अपेक्षा सध्याचा अभ्यासक्रम करतो. या कथा मुलांच्या वाचनात आल्यास प्रसंगांचे कथेमध्ये कसे रूपांतर करता येते याचे उदाहरण घालून देतात. पूरक वाचन म्हणून या कथा मुलांना अभ्यासास ठेवल्यास मुलांची वाचनाची आवड वृदिंगत करण्यासाठी, मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच लेखनासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.

गिरीश सहस्रबुद्धे यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ, रंगीत चित्रे आणि सुयोग्य मांडणीमुळे तयार झालेला हा देखणा अंक बालकुमारांना नक्की भुरळ पाडेल यात तीळमात्र शंका नाही.

शिक्षक आणि पालकांनी बालकुमारांना दिवाळीभेट म्हणून हा अंक आवर्जून द्यावा....नामदेव माळी , सांगली
( लेखक,शिक्षण खात्यातील सेवानिवृत्त प्रयोगशील अधिकारी.)

#साधना #साधनासाप्ताहिक #बालकुमारदिवाळी #दिवाळीअंक

आज 15 ऑक्टोबर, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती आणि त्याच निमित्ताने देशभरात साजरा होणारा ...
15/10/2025

आज 15 ऑक्टोबर, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती आणि त्याच निमित्ताने देशभरात साजरा होणारा वाचन प्रेरणा दिवस.

या निमित्ताने कर्तव्य साधनावरच्या दोन लेखांची ही पुनर्भेट -

1. पुढचं पुस्तक वाचण्याआधी...
गणेश मतकरी
https://www.kartavyasadhana.in/view-article/Ganesh-Matkari-on-book-reading

2. रिकाम्या मुठीतली भुईकमळं
कल्पना दुधाळ
https://www.kartavyasadhana.in/view-article/Kalpana-Dudhal-on-Reading-Books

साधना साप्ताहिकाचामुख्य दिवाळी अंक 2025अनुक्रमसाधनाचा 75 वा दिवाळी अंक ..संपादकीय1. इनर मंगोलियाची धमाल सहल     ....सानि...
13/10/2025

साधना साप्ताहिकाचा
मुख्य दिवाळी अंक 2025

अनुक्रम

साधनाचा 75 वा दिवाळी अंक ..संपादकीय

1. इनर मंगोलियाची धमाल सहल
....सानिया कर्णिक

2. जागतिक नेतृत्वाचे स्वप्न : संशोधनाची शक्ती आणि मातृभाषा
... गजानन जोशी

3. अरेबियन नाईट चा मराठी अनुवाद ; दुर्दैवी कहाणी
...राम जगताप

4. नवा गडी नवे राज्य पासून उत्तर पर्यंत
....क्षितिज पटवर्धन
संवादक : विनायक पाचलग

5. स्थलांतरितांच्या गोष्टी सांगणारे वेब पोर्टल
...रोली श्रीवास्तव
संवादक : हिनाकौसर खान

6. मोगांबे इंडियाची आश्वासक पत्रकारिता
...आरती शामल जोशी

7. प्रत्येक बातमी पर्यावरणीयच असते
...जोयदीप गुप्ता
संवादक : अतुल देऊळगावकर

8. शत्रु पक्षात कामाची आठ वर्षे
...अजित कानेटकर

9. पारधी कुठपर्यंत पोहोचले आहेत?
...हेरंब कुलकर्णी

10. कर्मयोगाचा प्रमोद
...मिलिंद बोकिल

आजच संपर्क करा :
साधना साप्ताहिक,
431 शनिवार पेठ, पुणे 30.
Mob : 070282 57757


#साधनादिवाळी #दिवाळी2025

5 ऑक्टोबर 2025 / पुणेप्रिय वाचकहो पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या वतीने शेतात येणाऱ्या वन्य प्राण...
05/10/2025

5 ऑक्टोबर 2025 / पुणे

प्रिय वाचकहो
पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या वतीने शेतात येणाऱ्या वन्य प्राण्यांच्या संदर्भात केलेल्या अभ्यासाची बातमी कालच्या लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झाली आहे, ते कात्रण वर दिले आहे. ही बातमी वाचून एका दीर्घ लेखाची आठवण झाली..

गेल्या वर्षी साधना साप्ताहिकाने, जळगाव जिल्ह्यातील विवेक वाघे या तरुणाला अनिल अवचट अभ्यासवृत्ती दिली होती, तेव्हा त्याने " शेतात येणारे प्राणी" या विषयावर सहा महिने अभ्यास संशोधन करून लिहिलेला लेख साधना साप्ताहिकाच्या 25 जानेवारी 2025 च्या अंकात प्रसिद्ध केला आहे. तब्बल सहा हजार शब्दांचा तो लेख पूर्वार्ध व उत्तरार्ध स्वरूपात आहे. त्या दोन्ही भागांच्या लिंक सोबत दिल्या आहेत. कमालीचा वाचनीय व अभ्यासपूर्ण असा हा लेख जिज्ञासुंनी जरूर वाचावा..!
...संपादक, साधना साप्ताहिक

लेखाचा पूर्वार्ध येथे वाचता येईल.. https://weeklysadhana.in/view_article/Agriculture-Farmer-Wildlife-Symbiosis-and-Conflict-vivek-waghe-part-1

लेखाचा उत्तरार्ध येथे वाचता येईल..
https://weeklysadhana.in/view_article/Agriculture-Farmer-Wildlife-Symbiosis-and-Conflict-vivek-waghe-part-2

3 ऑक्टोबर 2025 / पुणेप्रिय वाचकहो,साधना साप्ताहिकाचा युवा दिवाळी अंक27 सप्टेंबरला छापून आला. वर्गणीदार वाचकांना उद्याच्य...
03/10/2025

3 ऑक्टोबर 2025 / पुणे

प्रिय वाचकहो,
साधना साप्ताहिकाचा युवा दिवाळी अंक
27 सप्टेंबरला छापून आला. वर्गणीदार वाचकांना उद्याच्या सोमवारी 6 ऑक्टोबरला पोस्टाद्वारे पाठवला जाणार आहे. प्रकाशनपूर्व सवलतीत नोंदणी केलेल्या सर्वांना पोस्ट / कुरिअर द्वारे रवाना केला आहे.

10 हजार प्रती छापल्या होत्या, त्या संपल्या. आणखी दोन हजार प्रती छापून येत आहेत, त्यामुळे विक्रीसाठी साधना कार्यालयात उपलब्ध आहेत. या प्रती संपल्यावर नवीन प्रिंट ऑर्डर दिली जाईल, 15 ऑक्टोबर पर्यंत अंक विक्रीसाठी उपलब्ध राहतील. वर्गणीदार वाचकांना, प्रकाशनपूर्व नोंदणी केलेल्यांना पोस्ट/ कुरिअर द्वारे पुढील दोन तीन दिवसांत अंक मिळाले नाही तर साधना कार्यालयाशी संपर्क साधावा.

आणि अर्थातच, या अंकाची नव्याने मागणी असेल तर त्यासाठीही साधना कार्यालयाशी संपर्क साधावा. धन्यवाद !

साप्ताहिक साधना कार्यालय
431, शनिवार पेठ, पुणे 411030
Ph 02024451724
Mob 7028257757
[email protected]
प्रकल्प व्यवस्थापक : गोपाळ नेवे
Mob 9421702841

3 ऑक्टोबर 2025 / पुणेप्रिय वाचकहो,साधना साप्ताहिकाचा बालकुमार दिवाळी अंक 27 सप्टेंबरला छापून आला. वर्गणीदार वाचकांना काल...
03/10/2025

3 ऑक्टोबर 2025 / पुणे

प्रिय वाचकहो,
साधना साप्ताहिकाचा बालकुमार दिवाळी अंक 27 सप्टेंबरला छापून आला. वर्गणीदार वाचकांना कालच्या सोमवारी 29 सप्टेंबरला पोस्टाद्वारे पाठवला आहे. प्रकाशनपूर्व सवलतीत नोंदणी केलेल्या सर्वांना पोस्ट / कुरिअर द्वारे रवाना केला आहे.

20 हजार प्रती छापल्या होत्या, दोन हजार प्रती शिल्लक आहेत, त्यामुळे विक्रीसाठी साधना कार्यालयात उपलब्ध आहे. या प्रती संपल्यावर नवीन प्रिंट ऑर्डर दिली जाईल, 15 ऑक्टोबर पर्यंत अंक विक्रीसाठी उपलब्ध राहतील. वर्गणीदार वाचकांना, प्रकाशनपूर्व नोंदणी केलेल्यांना पोस्ट/ कुरिअर द्वारे पुढील दोन तीन दिवसांत अंक मिळाले नाही तर साधना कार्यालयाशी संपर्क साधावा.

आणि अर्थातच, या अंकाची नव्याने मागणी असेल तर त्यासाठीही साधना कार्यालयाशी संपर्क साधावा. धन्यवाद !

साप्ताहिक साधना कार्यालय
431, शनिवार पेठ, पुणे 411030
Ph 02024451724
Mob 7028257757
[email protected]
प्रकल्प व्यवस्थापक : गोपाळ नेवे
Mob 9421702841

साधना प्रकाशनाचे नवे पुस्तकप्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध - विनोद शिरसाठसाधनातील शंभर संपादकीय लेख2013 ते 2023 या दहा वर्षां...
02/10/2025

साधना प्रकाशनाचे नवे पुस्तक

प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध
- विनोद शिरसाठ

साधनातील शंभर संपादकीय लेख

2013 ते 2023 या दहा वर्षांत मी साधना साप्ताहिकात चारशे संपादकीय लेख लिहिले, त्यातील सर्वोत्तम शंभर लेख या पुस्तकात घेतले आहेत. त्यामुळे, कोणते विषय आलेले नाहीत किंवा कोणत्या विषयावर आणखी लिहायला हवे होते, अशा प्रकारच्या अपेक्षा या पुस्तकातील लेख वाचून व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. उर्वरित तीनशे लेखांमध्ये बरेच वेगवेगळे विषय येऊन गेलेले आहेत. या पुस्तकात निवडलेले लेख असे आहेत, जे परिपूर्णतेच्या जवळ जाणारे आहेत, जे आज-उद्याच्या वाचकांना वाचायला आवडतील आणि मुख्य म्हणजे त्या दशकात साधनाची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बाबतीत काय भूमिका होती हे दाखवू शकतील.

अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होत असतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा वा करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच, एका मयदिनंतर अभ्यासापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. 'सम्यक सकारात्मक' हा माझा दृष्टीकोन आहे, त्यातून आकाराला आलेल्या भूमिकेला 'प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध' असे म्हणता येईल. अर्थातच, एका प्रवाहासाठी दुसऱ्या प्रवाहाविरुद्ध आणि एका प्रवाहासाठी त्याच प्रवाहाविरुद्धही ! इथे मला विरोधासाठी विरोध अपेक्षित नाही, रचनात्मक वाटचाल अभिप्रेत आहे..

पाने : 584 (हार्डबाऊंड),
किंमत : 700 रुपये, सवलतीत 500 रुपये
(टपाल खर्च 100 रुपये वेगळा )

पुस्तके खरेदी करण्यासाठी आजच संपर्क करा
संपर्क : साधना प्रकाशन
431 शनिवार पेठ, पुणे 30
Ph. 020 24459635/ Mob. 7058286753 | 7499714591 (whatsaap)
[email protected]
Web : https://sadhanaprakashan.in/

#पुस्तक #साधना #मराठी

Address

431, Shaniwar Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+917028257757

Alerts

Be the first to know and let us send you an email when Weekly Sadhana- साप्ताहिक साधना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Weekly Sadhana- साप्ताहिक साधना:

Share