
08/05/2025
भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव वाढला; सुरक्षाव्यवस्था सतर्क
24 न्यूज | नवी दिल्ली | 08 मे
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील काही ठिकाणांवर लक्ष्य करून हवाई कारवाई केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या कारवाईत अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या कारवाईनंतर पाकिस्तानकडूनही प्रतिउत्तर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील हवाई तळ आणि अन्य लष्करी ठिकाणांकडे क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराच्या S-400 क्षेपणास्त्र प्रतिरक्षा प्रणालीने या हल्ल्यांना यशस्वीरित्या अडवले.
दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि तीनही सैन्यदलांचे प्रमुख यांच्यात उच्चस्तरीय बैठक सुरू असून, सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. रात्री भारताकडून पुढील निर्णायक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, भारतीय लष्कराने जम्मू विद्यापीठाजवळ दोन संशयित ड्रोन पाडले आहेत. श्रीनगर विमानतळ तसेच सीमावर्ती भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू-कश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील सीमावर्ती गावांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने ब्लॅकआउटची अंमलबजावणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील या वाढत्या तणावामुळे दोन्ही देशांच्या लष्करी हालचालींवर जगभराचे लक्ष केंद्रित झाले आहे.