27/08/2026
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर जोरदार टीका केली. महामार्गाच्या कामाचा वेग, रस्त्यांची अवस्था आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपरोधिक शब्दांत, “मंत्री महोदयांना रस्ते बनवायला दुबईच्या राजाने बोलावलं होतं!” असा टोला नितीन गडकरींना लगावला. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत वारंवार आश्वासने दिली जात असली, तरी प्रत्यक्षात प्रवाशांना खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई गोवा महामार्गावर पाहणी करताना, हा पूल स्पेस टेक्नॉलॉजीने बांधला आणि काही दिवसातच हा ब्रिज बंद झाला. नॅशनल हायवेच्या लोकांनी ऑडिट केलं, त्यानंतर ब्रिज हा बंद केला. मुंबई गोवा महामार्गावर चा हा ब्रिज आहे, काही ठिकाणी खड्डे आहेत.
महामार्गाच्या पाहणीदरम्यान रस्त्याची प्रत्यक्ष परिस्थिती, रखडलेली कामे आणि वाहनचालकांच्या अडचणींची माहिती घेण्यात आली. मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणातील नागरिकांसाठी आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, त्याचे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या या टीकेमुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.