16/10/2025
टाईम्स ऑफ साताराच्या बातमीचा दणका..!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताच्या अनधिकृत फलकांवर पालिकेची मोठी कारवाई
सातारा | टाईम्स ऑफ साताराने उघड केलेल्या अनधिकृत फ्लेक्स प्रकरणाची अखेर सातारा पालिकेने गंभीर दखल घेतली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल सातारा दौऱ्यावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी साताऱ्यातील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात लावण्यात आलेल्या अनधिकृत फलकांवर आता थेट कारवाई करण्यात आली आहे. पालिकेने या प्रकरणात 17 जणांना नोटीस बजावून तब्बल 1 लाख 38 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे तर शहरातील काही फ्लेक्सही जप्त करण्यात आले आहेत.
नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर संबंधितांनी हा दंड भरला नाही, तर त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
टाईम्स ऑफ साताराने केलेल्या या बातमीमुळे प्रशासनाला तातडीने हालचाल करावी लागली. शहरातील नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत केले असून, अनधिकृत जाहिरातींवर लगाम लावण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
या प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनीही सुरुवातीपासून पालिकेकडे तातडीने कारवाईची मागणी केली होती. मोरे यांनी सांगितले की, “पालिकेने आता संबंधितांना नोटीस बजावल्या असल्यातरी दंड वसूल होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहोत.”
त्यामुळे या प्रकरणावर केवळ कारवाईच नव्हे, तर दंडाची वसुलीही होईल का ?, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.