19/10/2025
संपादकीय
साधनाचा 75 वा दिवाळी अंक
साधना साप्ताहिकाचा पहिला अंक 15 ऑगस्ट 1948 रोजी निघाला, तेव्हापासून गेली 77 वर्षे हे साप्ताहिक अखंड प्रकाशित होत आहे. मात्र साधनाचा पहिला दिवाळी अंक 1951 मध्ये निघाला, त्यामुळे साधनाचा हा 75 वा दिवाळी अंक आहे. या पाऊण शतकातील साधना दिवाळी अंकांमध्ये वेगवेगळे बदल होत गेले, ते बदल अंतरंग व बहिर्रंग या दोहोंमध्ये होते. मात्र त्या सर्वांचा गाभा समान राहिला आहे, समाजाभिमुख राहिला आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवरील ललित-वैचारिक लेखन साधनाच्या नियमित अंकांमध्ये प्रसिद्ध होत आले आहे, मात्र दिवाळी अंकांमध्ये ललित साहित्याचे प्रमाण सुरुवातीपासून साठाव्या वर्षापर्यंत जवळपास अर्धे राहिले. त्यात कथा, कविता, कादंबरी यांचा समावेश होता. गेल्या पंधरा वर्षांत मात्र ललित साहित्याचा मजकूर साधना दिवाळी अंकांतून कमी होत गेला आहे. त्याचे एक कारण ललित साहित्य प्रसिद्ध करणारे अनेक दिवाळी अंक गेल्या काही वर्षांत वाढलेले आहेत, दुसरे कारण साधनाची ठळक ओळख ललित-वैचारिक स्वरूपाच्या लेखनासाठीच आहे. परंतु, तिसरे कारण अधिक महत्त्वाचे आहे. ते म्हणजे, 60 व्या वर्षापासून साधनाने बालकुमार दिवाळी अंक, तर 65 व्या वर्षापासून युवा दिवाळी अंक प्रकाशित करायला सुरुवात केली. म्हणजे गेली सतरा वर्षे बालकुमार दिवाळी अंक आणि गेली बारा वर्षे युवा दिवाळी अंक नियमितपणे प्रकाशित होत आहेत. त्यामुळे साधनाच्या वर्गणीदार वाचकांना गेल्या एक तपापासून दरवर्षी साधनाचे तीन दिवाळी अंक वाचण्याची सवय झाली आहे. आणि आम्हीसुद्धा दिवाळी अंकांचे नियोजन करताना तिन्ही अंकांचा एकत्रित विचार करतो. त्यातील आशय व विषय निवडताना, त्यातून विविध समाजघटकांचे प्रतिबिंब पडेल असा विचार केलेला असतो. शिवाय वर्षभरात साधनाचे पाच-सात तरी विशेषांक किंवा मिनी विशेषांक येतात, ते विशिष्ट थीम घेऊन काढले जातात. साहजिकच वर्षभरातील सर्व 48 अंकांचा विचार केला तर साधनातील वैविध्य बरेच जास्त असल्याचे जाणवेेल.
अशा पार्श्वभूमीवर, या वर्षीच्या तीन दिवाळी अंकांकडे पाहायला हवे. या वर्षी बालकुमार दिवाळी अंकामध्ये प्रेमचंद यांच्या पाच (उर्दू, हिंदी) कथांचे अनुवाद प्रसिद्ध केले आहेत, हे सर्व अनुवाद चंद्रकांत भोंजाळ यांनी केले आहेत. त्या सर्व कथांच्या केंद्रस्थानी बालकुमार वयोगटातील मुले-मुली आणि त्यांचे भावविश्व आहे. आजपासून शंभर वर्षांपूर्वी (म्हणजे 1925 दरम्यान) लिहिल्या गेलेल्या या कथा आहेत. आता त्या सचित्र वाचताना वाचकांच्या मनात आपापल्या आयुष्यातील जुन्या स्मृती ताज्या होतील, अंगावर रोमांच येतील. शंभर वर्षांपूर्वीच्या या कथांमधील समाजजीवन वरवर पाहता आता बरेच बदललेले दिसेल, पण भारतातील विविध प्रांतांत आणि जगाच्या कानाकोपऱ्यांत असे समाजजीवन अगदी किरकोळ बदल वगळता आजही पाहायला मिळेल. शिवाय त्यातील मानवी भावभावना आणि प्रवृत्ती-अपप्रवृत्ती आजही सर्वत्र दिसताहेत. प्रेमचंद यांच्या लेखनातील सार्वत्रिकता व कालातीतता या मूल्यांची प्रचिती इथे अनुभवायला मिळते. युवा दिवाळी अंकांत गेल्या सहा वर्षांपासून विविध क्षेत्रांतील कर्तबगार युवांच्या दीर्घ मुलाखती प्रसिद्ध केल्या जातात. या वर्षीच्या युवा अंकात नेहा सिंह राठोड (कवी, गायक), करण सिन्हा (समाजकार्य), सिद्धेश साकोरे (शेती), शर्वरी देशपांडे (गायिका, अभिनेत्री), अजिंक्य कुलकर्णी (उद्योग) या पाच युवांच्या मुलाखती आहेत. त्या केवळ युवाच नाही तर कोणत्याही वयोगटातील वाचकांच्या कक्षा रुंदावणाऱ्या आहेत.
आणि या मुख्य दिवाळी अंकात दहा लेख आहेत. त्यांचे ढोबळमानाने दोन विभाग करता येतील. पहिल्या विभागामध्ये चार लेख-मुलाखती दाखवता येतील. त्यात सानिया कर्णिक या युवतीने लिहिलेला लेख आहे. तिने गेल्या वर्षी साधनाच्या युवा दिवाळी अंकात व मुख्य दिवाळी अंकात आणि नंतरच्या तीन अंकांत असे पाच लेख लिहिले, ते सर्व चीनमधील समाजजीवन आणि तिची भ्रमंती यासंदर्भात आहेत. तीच साखळी पुढे घेऊन जाणारा तिचा लेख या अंकात आहे. चीनविषयी एका बाजूला भारतीयांच्या मनात राग असतो आणि त्याच वेळी चीनच्या प्रगतीविषयी कुतूहल असते, त्या संदर्भात गजानन जोशी यांनी लिहिलेला लेख चिनी भाषा आणि चिनी कार्यसंस्कृती याबाबत मननीय आहे. ‘अरेबियन नाइट्स’ हे पुस्तक रिचर्ड बर्टनमुळे अख्ख्या जगाला माहीत झाले आहे, जगभरातील सर्व प्रमुख भाषांमध्ये त्याचे अनुवाद झालेले आहेत. त्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाला या दिवाळीत पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने राम जगताप यांनी लिहिलेली त्या पुस्तकाच्या निर्मितीची कहाणी मराठी वाचन व्यवहारावर आणि ग्रंथ व्यवहारावर वेगळा प्रकाश टाकणारी आहे. कालच्या 15 ऑगस्टला साधना साप्ताहिकाने ‘भूमिका’ नाटकावर विशेषांक काढला, त्या नाटकाचे लेखक क्षितिज पटवर्धन यांची दीर्घ मुलाखत या अंकात आहे. सिनेमा-नाटक क्षेत्रातील त्यांच्या वाटचालीवर दृष्टिक्षेप टाकणारी ही मुलाखत, त्यांच्याविषयीचे कुतूहल काही प्रमाणात शमवेल आणि मोठ्या प्रमाणात वाढवेल.
दुसऱ्या विभागामध्ये सहा लेख-मुलाखती दाखवता येतील. मागील तीन दशके सखोल व वैशिष्ट्यपूर्ण लेखन करणाऱ्या अतुल देऊळगावकर यांनी पर्यावरण व विकास यांच्यासंदर्भात पत्रकारिता करणाऱ्या दोन मुलाखती (रोली श्रीवास्तव व जोयदीप गुप्ता) व एक लेख (आरती श्यामल जोशी) यांचे संयोजन केले, आणि ते उत्तम प्रकारे अंमलात आणले. त्यामुळे तीन वेगवेगळ्या डिजिटल माध्यमांचा अनोखा परिचय या अंकातून होतो आहे. या तीन लेखांना जोडणारे आणखी तीन लेख दाखवता येतील. त्यामध्ये हेरंब कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष भ्रमंती करून पारधी समाजाच्या स्थिती-गतीचा घेतलेला शोध महत्त्वाचा आहे. नुकतेच निधन झाले, त्या प्रमोद कुलकर्णी यांच्या सामाजिक कार्याची नेमकी वाटचाल दाखवणारा लेख मिलिंद बोकील यांनी लिहिला आहे, तो सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे. आणि सामाजिक संस्थांना मोठे आर्थिक पाठबळ देऊन तळागाळातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या फोर्ड फाउंडेशनमधील कामाचे अनुभव आणि त्यातून आकाराला आलेले आकलन, या संदर्भातील अजित कानिटकर यांचा लेखही मननीय आहे.
अशा या दोन्ही विभागांतील मिळून 10 लेख/मुलाखती वाचकांना जरा जास्तीचा निवांत वेळ काढून वाचावे लागतील. प्रत्येक लेख वाचून झाल्यावर मनात उमटणारे तरंग वेगवेगळ्या प्रकारचे असतील. दिवाळीच्या आनंदात संमिश्र भावना जागवणारे असतील. त्यातील काही लेख अंतर्मुख करायला लावणारे आहेत, काही लेख बदलाची ऊर्मी जागवणारे आहेत, काही लेख कृतिप्रवण होण्याची इच्छा उत्पन्न करणारे आहेत. अशा या अंकाच्या निर्मितीला साधना कार्यालयाचे सहकारी, लेखक, हितचिंतक, वाचक, जाहिरातदार इत्यादी अनेक घटकांचे साहाय्य नेहमीप्रमाणेच लाभले आहे. त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद आणि दिवाळीच्या शुभेच्छा...!
#दिवाळी2025