
22/07/2025
नातं पतीपत्नीचं..... नात्याचा निर्धार पूर्वक सांभाळ
#दलेमनन्यूज
*काय आणि कसं असतो हो पती पत्नीचं नातं? बऱ्याच विवाहित जोडप्यांना पती पत्नीच्या मधुर नात्याचा अर्थ तरी माहीत असतो का? अशी शंका येते. दुर्दैवाने आजकाल बरीच जोडपी हे नातं समजून घेण्यात कमी पडतात असंच दिसतं, जे की फार निराशाजनक आहे.*
*पती पत्नी म्हणजे देखणा राजबिंडा नवरा आणि सुंदर सौंदर्यसंपन्न बायको एवढंच मर्यादित नाहीये. नुसतं दिसायला सुंदर असणं म्हणजे सुंदर नातेसंबंध नव्हे !*
*अनुरूप जोडीदार शोधताना एक लक्षात घेतलं पाहीजे की, आपल्या अपेक्षेप्रमाणे सगळं काही मिळेल किंवा होईल असं कधीच असत नाही, कारण या जगात शंभर टक्के परिपूर्ण कुणीच असत नाही, म्हणून आपल्या अपेक्षा शंभर टक्के परिपूर्ण होऊच शकत नाहीत. थोडं फार इकडं तिकडं असणारच, थोडं फार कमी जास्त होणारच हे समजून घेता आलं पाहिजे.*
*सुंदर देखणी गोरीपान मुलगी, किंवा खूप श्रीमंत, पैसेवाला मुलगा म्हणजे सर्वकाही नाही. खूप सौंदर्य असेल, किंवा खूप पैसे असतील म्हणजे एकमेकांवर विशुद्ध प्रेम असेलच याची खात्री देता येत नाही, आणि* *"पैशाने प्रेम विकत घेता येत नाही" बरंका*
*पतिपत्नीच्या नात्यामध्ये आदराची नितांत आवश्यकता असते. दोघांनी एकमेकां विषयी आदर बाळगला पाहिजे आणि प्रत्येक वेळी, प्रत्येक आवश्यक प्रसंगी तो व्यक्तही झाला पाहिजे. काय असतो ओ खरंच पतीपत्नीच्या या नात्याचा अनुबंध !! आज तेच मुद्देसूद पणे बघुयात की जरा:*
*★पतीपत्नीने एकमेकांचा स्वीकार जसे आहे तसे या तत्त्वावर करायला हवा.*
*★पतीपत्नीने एकमेकांना पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे.*
*★पतीपत्नीने एकमेकांशी नातं जोडल्यानंतर एकमेकांनी एकमेकांची मनापासून आवश्यक तेवढी काळजी घेतलीच पाहिजे.*
*★पतीपत्नीने आपल्या नात्याविषयी आणि एकमेकां विषयी अभिमान, गर्व बाळगला पाहिजे.*
*★पतीपत्नीने जसे आहे त्या परिस्थितीत, प्रत्येक प्रसंगी आवर्जून एकमेकांचं कौतुक केलं पाहिजे एकमेकांची प्रशंसा , स्तुती केली पाहिजे.*
*★पतीपत्नीने जे आणि जसं आहे तशा परिस्थितीत एकमेकांवर संपूर्ण प्रेम केलं पाहिजे, कुणी जास्त किंवा कुणी कमी असं कधी असत नाही.*
*★पतीपत्नीचा एकमेकांवर पूर्ण विश्वास असलाच पाहिजे.*
*★पतीपत्नीने एकमेकां विषयीच्या आवडी निवडीचा आदर केला पाहिजे, आपल्या जोडीदाराला काय आवडतं काय आवडत नाही हे दोघांनीही परस्परांचं सांभाळलं पाहिजे, जपलं पाहिजे.*
*★पतीपत्नीने एकमेकांना सावरून घेत सांभाळलं पाहिजे. दोघेही जे काही कार्य करत आहेत,त्यात एकमेकांना साथ दिली पाहिजे, समर्थन दिले पाहिजे आणि केलेही पाहिजे.*
*★पतीपत्नीने एकमेकांना आपापल्या कार्यक्षेत्रात सर्वोच्च स्थानी जाण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे, एकमेकांना प्रेरित करत परस्परांचं कौतुक केलं पाहिजे.*
*★पतीपत्नीने एकमेकां मधील चांगल्या गोष्टींचा जसा स्वीकार केला आहे, तसा एकमेकांच्या काही वाईट गोष्टी, सवयी, जोडीदाराच्या आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टींचा ही स्वीकार करता आला पाहिजे.*
*★पतीपत्नीने चुकीच्या वेळी एकमेकांना क्षमा करायला, माफ करायला शिकलं पाहिजे.*
*★पतीपत्नीने, नवऱ्याने बायकोवर, किंवा बायकोने नवऱ्यावर , असं एकमेकांवर सगळंच काही सोपवून मोकळं न होता, परस्परांनी समजून घेत समानतेने जबाबदारीचं पालन केलं पाहिजे.*
*खरं सांगू का आजकालच्या जमान्यात अशी सगळंच चांगलं आपल्या मनासारखं असणारी माणसं, सर्वोत्तम, सर्वगुणसंपन्न असणारी व्यक्ती, जोडीदार म्हणून भेटणं खरंच खूप अवघड आहे ओ!*
*तरीही थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने किंवा ईश्वरी कृपेने म्हणा तुम्हाला भेटलेला, मिळालेला, किंवा निवडलेला जोडीदार हा उत्तमच असतो. तो ईश्वराचा आशीर्वादच असतो, किंवा ईश्वराची तीच इच्छा असते. हे समजून घेऊन उभायतांनी ह्या ईश्वरी नात्याचा निर्धार पूर्वक सांभाळ केला पाहिजे.*
*एक पक्कं लक्षात असुद्यात की, पतिपत्नीचं नातं म्हणजे पूर्णवेळची, कायमची, वचनबद्धता असते, कायमस्वरूपी तडजोडही असते, तीच स्वीकारता आली पाहिजे, पूर्णत्वाने निभावता आली पाहिजे !!*
*म्हणूनच आपला निवडलेल्या, मिळालेल्या, स्वीकारलेल्या जोडीदाराला जबाबदारीने, प्रेमाने आपुलकीने आणि काळजीपूर्वक अखेरपर्यंत सांभाळा ! कुणीही कुणाला दुखावू नका, एकमेकांशी प्रामाणिक रहा, समाधानी रहा !!, कारण तुमचा जोडीदार हा ईश्वराने खास तुमच्यासाठी निवडलेला असतो !!*
*लेख संपूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद*
💝
*लेख आवडला तर नक्कीच पुढे पाठवा, नावासह शेअर करा* 😊♥️❤️
*मकरंद दीक्षित, कात्रज, पुणे*