17/07/2025
#घरफोडी प्रकरणाचा बार्शी #पोलिसांकडून छडा – दोन #आरोपी अटकेत, ३.४५ लाखांचा #मुद्देमाल जप्त
बार्शी शहरात नुकत्याच घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत बार्शी शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, चोरी गेलेल्या १६.५ तोळे सोन्याचे दागिने व ९७,५०० रुपयांची रोकड असा एकूण ३,४५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही घटना कसबापेठ, बार्शी येथे घडली होती. फिर्यादी दुर्गा नारायण पौळ यांच्या राहत्या घरातील कपाटातून अज्ञात चोरट्याने ३,९७,५०० रुपयांची चोरी केल्याची फिर्याद १७ जून २०२५ रोजी दाखल झाली होती. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपींचा शोध सुरु केला.
तपासादरम्यान ही घरफोडी फिर्यादी यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या सुरज बाळासाहेब हारकर आणि त्याच्या साथीदार माधव सोनाजी कुलकर्णी यांनी केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १६.५ तोळे सोन्याचे दागिने व ९७,५०० रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक मा. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत उमाकांत कुंजीर, अजित वरपे, अमोल माने, बाळकृष्ण दबडे, बाबासाहेब घाडगे, संगाप्पा मुळे, अंकुश जाधव, धनराज फत्तेपुरे, सचिन देशमुख, राहुल उदार, सचिन नितनात, अवि पवार, प्रल्हाद अकुलवार, इसामियाँ बहिरे, रामेश्वर मस्के, वेतन झाडे, आणि सायबर पोलीस ठाण्याचे रतन जाधव आदींचा मोलाचा सहभाग होता.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर हे करत आहेत. बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची ही कार्यक्षमता निश्चितच कौतुकास्पद आहे.