10/08/2025
आमच्या सोलापूरची गंमतच न्यारी आहे! इथलं हे चित्र साऱ्या देशभरात समान दिसत असेल असा माझा होरा आहे!
नुकतेच काही दिवसांपूर्वी आमच्या भागातील, कार्यकाल संपलेल्या नगरसेवकांनी एका नामसंकीर्तन सप्ताह सोहळ्यास लाखोची देणगी दिली, अशीच देणगी शहराच्या मध्यभागातील नगरसेवकांनी मोहरमसाठी दिली होती.
याही आधी ज्या कुठल्या महापुरुषांच्या जयंत्या असतील, पुण्यतिथ्या असतील, आणखी कुठले वाटेल ते स्मरण / अवतरण दिन असतील वा सणवार असतील, उत्सव असतील अथवा वाट्टेल त्या कारणासाठी निघालेल्या मिरवणुका असतील तर त्यात सामील असलेल्या लोकांना ही मंडळी सढळ हस्ते पैसे देत असतात!
मग लोक लै लै खुश होतात! आपल्या आजी/ माजी मेंबरने इतके इतके पैसे दिले, इतक्या जेवणावळी दिल्या, एवढ्याचा मंडप दिला, तेवढ्याचे ढोल लेझीम दिले, फलाण्याचा मंडप दिला, अलाण्याचे देणे दिले, आणि वर तोंड करून काही रोख रक्कमही दिली जिच्या आधारे मंडळाच्या पोरांनी ‘ओलासुका श्रमपरिहार‘ केला याचा आमच्या लोकांना खूप आनंद होत असतो! त्यातले समाधान स्वर्गीयच म्हटले तरी चालेल!
एवढेच नव्हे तर आपल्या वार्डांमध्ये कुठल्याही प्रकारचे पब्लिसिटी मिळवून देणारे कार्यक्रम साजरे केले जात असतील तर तिथे हे लोक हजेरी लावतात, मंडपानजीक खुर्च्या टाकून बसतात!
कार्यक्रमस्थळाच्या आजूबाजूला मोठमोठाले फ्लेक्स लावतात. त्या फ्लेक्सवर त्यांच्यासोबत त्या त्या मंडळाची साडेपाच पाऊणेआठ पोरंठोरं (कुणी गॉगल लावून तर कोणी मोबाईल हातात घेऊन) अवतीर्ण झालेली असतात!
यांची वर्णी तिथे यासाठी लागलेली असते की हे त्या इसमाच्या चाटूगिरीसाठी ओळखले जावेत! हे पोट्टेही बदमाश असतात, त्यांनी त्या बदल्यात कापडं घेतलेली असतात, जुना मोबाइल हडपलेला असतो, हड्डीबोटीची पार्टी घेतलेली असते!
तिथे त्या नगरशोवकाचा फोटो ही आठवण करुन देण्यासाठी असतो की, 'बघा, मी तुमच्या भागात आमच्या गोष्टीसाठी एवढ्या एवढ्या खर्च केला आहे!"
लोक यावर भलतेच खुश होतात! कारण लोकांच्या अपेक्षाच मुळी एवढयाच असतात! नगण्य अपवाद वगळता कुणालाही वाटत नाही की चांगले रस्ते व्हावेत, कुणालाही वाटत नाही की स्वच्छ हवा मिळावी,
शहरात भरपूर झाडे असावीत,
दिवाबत्ती असावी,
वेळेवर नि स्वच्छ पाणी मिळावं,
शहरात बागा असाव्यात,
चांगल्या शाळा असाव्यात,
उत्तम बस सेवा असावी,
भाजी मंडया असाव्यात,
सुसज्ज नि ट्रॅफिकजाम मुक्त बाजारपेठ असावी,
नोकऱ्या असाव्यात यासाठी कुणी आग्रही नसतं पण
आपल्या अमुक तमुक जातीच्या ढमुक खमुक महापुरुषाच्या सोहळ्यासाठी, सणासाठी तुम्ही इतक्या रुपयाची वर्गणी द्या, आमच्या मिरवणुकीला इतक्या रुपयाचा निधी द्या यासाठी मात्र लोक लोचट बधीरासारखे आग्रही असतात!
आणि त्यातच ते सुखही मानतात किंबहुना इथल्या जनतेला यांनी सोकावून ठेवले आहे. मात्र स्थानिक पत्रकार याचा वेगळाच उल्लेख करतात, 'आमच्या मान्यवरांनी जनतेची नाळ ओळखली आहे' असे ते प्रेमाने म्हणतात!
खरंच, इथे विकास हवाय कुणाच्या बापाला?
आमच्याकडे एक आमदार आहेत जे गल्लीतल्या कुणाच्याही बारशाला जातात, जावळाला जातात, साखरपुडा लग्नाच्या बैठकीला जातात, लग्नाला जातात, मयतीला जातात, दहाव्याला जातात, तेराव्याला वर्षश्राद्धालाही जातात.
सामान्य जनतेला याचे फार अप्रूप असते!
मात्र हे आमदार महोदय, नगसेवक आदी मंडळी रस्त्यातले खड्डे नीट करत नाहीत वा पिण्याचे पाणी वेळेवर येत नाही याबद्दल त्यांच्याविषयी आमच्या मनात राग नसतो!
आपला नेता छोट्या छोट्या गोष्टीसाठी गल्लीत येऊन जातो यावर ते समाधान मानतात, त्याला बसायला स्वतःच्या बुडाखालची खुर्ची काढून देतात!
पण आपला नेता विकासाचे चक्र हलवत नाही याबद्दल ते चकार शब्द बोलत नाहीत कारण मुळात त्यासाठी ते आग्रहीच नसतात!
लोकांचा आग्रहाचा आणि प्राधान्याचा क्रम बदलण्यासाठी राजकारण्यांनी त्यांच्या पाठीचे कणे वाकवेले आहेत!
आमच्या राजकारणी मंडळींचे हे लोककल्याणाचे कार्य विलक्षणच म्हणावे लागेल!
शुद्ध मराठीमध्ये सांगायचे झाल्यास आमच्या पुढाऱ्यांनी, लोकांना बुळगे करुन ठेवलंय! हे आपण बिनदिक्कत म्हणू शकतो कारण, माझ्या शहरात असे पोके पोके लोक मोठ्या प्रमाणात आढळतात!
इथे जागोजागी खड्डे असलेले रस्ते आहेत, उशाला धरण असूनही पाच दिवसाआड गढूळ पाणीपुरवठा होतो, अशुद्ध प्रदूषित हवा आहे, खालावलेली आरोग्यसेवा आहे, कोलमडून गेलेली परिवहन सेवा आहे! मात्र एकही नेता याविषयी आपलं तोंड उघडत नाही!
तरी देखील इथला प्रत्येक कणाहीन माणूस आपल्या जातीच्या, आपल्या वार्डातल्या नगरसेवकाला, आमदाराला, खसदाराला, पालकमंत्र्याला झुकून सलाम करतो, मिरवणुकीस पैसे दिल्याबद्दल फेटे बांधून सत्कार करतो, जमल्यास हातपायही दाबून देतो!
वर तोंड करून हे शहर उत्सवप्रिय आहे, इथे रोज कसल्या ना कसल्या मिरवणुका निघत असतात हे छाती फुगववून सांगितले जाते! व्वा, क्या सीन है!
आपण यांना प्रश्न विचारायला गेलो की लगेच सवाल येतो, 'ओ सफेद शर्ट तुम्हारी तकलीफ क्या है?'
हे सर्व दृश्य खूप खूप छान आहे!
आपले हक्क मरत असल्याची साधी नोंदही घेणारा हा माणूस जपला पाहिजे किंबहुना कधीकाली ताठ कण्याचा असलेला इथला माणूस अपृष्ठवंशीय होत असल्याचं हे प्राथमिक लक्ष म्हटलं पाहिजे!
त्यासाठी तमाम पुढाऱ्यांचे ऋण मानले पाहिजेत!
आता तर काय महानगरपालिकांची निवडणूक जवळ आलीय या सर्व लोकांची रोज चंगळ सुरु आहे आणि आमचे आवडते शहर रोज कणाकणाने मरते आहे!
सोशल मीडियावरील दोस्तहो, इथे तुम्ही माझ्या शहराचे नाव बदलून, तुमच्या शहराचे नाव घातले तरी चालेल!
कारण थोडाफार फरक वगळता तुमच्याकडेही हीच बोंब असेल कारण ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात!
यथा प्रजा तथा राजा!
- समीर गायकवाड