30/07/2025
#पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार पालवी संस्थेच्या मंगलताई शहा यांना जाहीर!
विद्यापीठास 21 वर्षे पूर्ण; शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन
सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा व मानाचा जीवनगौरव पुरस्कार पंढरपूर येथील पालवी संस्थेच्या संस्थापिका श्रीमती मंगलताई शहा यांना जाहीर झाल्याची घोषणा कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. यात सोलापूर ही जन्मभूमी, कर्मभूमी व ऋणानुबंध असणाऱ्या महनीय व्यक्तीस जीवनगौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. यंदाच्या या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी श्रीमती मंगलताई शहा या ठरल्या आहेत. सामाजिक क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. पालवी संस्थेच्या माध्यमातून एचआयव्ही एडसग्रस्त अनाथ बालकांचे संगोपन व त्यांना शिक्षण देण्याचे महत्वपूर्ण कार्य मंगलताई शहा यांच्याकडून होत आहे. यानिमित्त विद्यापीठाच्या अधिकार मंडळाकडून जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांना विनंती करण्यात आली, त्यांनी सदरील विनंती स्वीकारली आहे. रोख 51 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शुक्रवार, दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी विद्यापीठाचा 21 वा वर्धापन दिन समारंभ साजरा होणार आहे. सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम कुलगुरू प्रा. महानवर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या समारंभास मुख्य अतिथी म्हणून नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम, नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे तर प्रमुख अतिथी म्हणून एचएसएनसी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, आमदार श्री गोपीचंद पडळकर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याचबरोबर विद्यापीठाच्या विविध पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते, त्यानुसार तज्ञ समितीने विविध पुरस्कारांची देखील निवड केली आहे. या ही पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी होणार आहे. विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या या सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, विविध अधिकार मंडळाचे सदस्य, शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेसाठी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव डॉ. अतुल लकडे, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे, परीक्षा संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, सहाय्यक कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे, डॉ. अंबादास भासके आदी उपस्थित होते.
यांना जाहीर झाले पुरस्कार
1) उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार: व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स सोलापूर.
2) उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार: प्राचार्य डॉ. विजय अनंत आठवले, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर.
3) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय): डॉ. भाग्येश बळवंत देशमुख, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर.
4)उत्कृष्ट शिक्षकेत्तर अधिकारी पुरस्कार (वर्ग एक व दोन विद्यापीठ): राजीव उत्तम खपाले, लेखापाल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.
5)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार वर्ग तीन: डॉ. शिरीष शामराव बंडगर, वरिष्ठ लिपिक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.
6)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार वर्ग चार: नवनाथ नागनाथ ताटे, चौकीदार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.
7)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (महाविद्यालय): राजेंद्र शंकर गिड्डे, वरिष्ठ लिपिक, मारुतीराव हरिराव महाडिक कला व वाणिज्य महाविद्यालय, मोडनिंब
8)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (चतुर्थश्रेणी कर्मचारी महाविद्यालय): दत्ता निवृत्ती भोसले, ग्रंथालय परिचर, छत्रपती श्री शिवाजी रात्र महाविद्यालय सोलापूर आणि डॉ. रेवप्पा सिद्धाप्पा कोळी, प्रयोगशाळा परिचर, संगमेश्वर कॉलेज, सोलापूर.
जीवनगौरव पुरस्कार प्राप्त मंगलताईंविषयी...
एचआयव्ही एडसग्रस्त अनाथ बालकांच्या संगोपनाकरता मंगलताई शहा यांनी 2001 मध्ये पंढरपूरमध्ये ‘पालवी’ नावाची संस्था स्थापन केली. दोन मुलांच्या प्रवेशापासून सुरू झालेली ही संस्था आता बहू अंगांनी विस्तारली आहे. संस्थेने या मुलांकरता स्वत:ची शाळा, गोशाळा सुरू केली आहे. एडसग्रस्त अनाथ बालकांबरोबरच अत्याचार पीडित कुमारी माता, मनोरुग्ण माता, विवंचनेने पीडित स्त्रिया यांचा तात्पुरता किंवा कायमस्वरूपी सांभाळ केला जातो. परित्यक्ता, विधवा, वृद्ध, मनोरूग्ण यांना आधार दिला जातो.
महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई काम, शेती काम, प्लंबिंग इत्यादी कामे त्यांना शिकवली जातात. याखेरीजही संस्थेतर्फे वंचितांकरता अनेक प्रकल्प राबवले जातात. मंगलाताईंनी प्रभा-हिरा प्रतिष्ठानच्या अंतर्गत ‘पालवी’ या संस्थेची स्थापना केली आहे. संस्थेचा असा विश्वास आहे की, जन्माला आलेली सर्व बालके समान आहेत आणि आरोग्य, शिक्षण, सुरक्षित आणि कलंकमुक्त वातावरणासह प्रेमळ, आनंदाने भरलेले बालपण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे.
Solapur Universitry Solapur