06/03/2026
पर्यावरणपूरक सेवेची तपपूर्ती!
--
‘इको फ्रेंडली क्लब’चा 12 व्या वर्षीही इको फ्रेंडली रंगांचा जागर!
--
सोलापूर : रंगपंचमी म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते पाण्याचे फवारे आणि रासायनिक रंगांची उधळण. पण, याच सणाला पर्यावरणपूरक वळण देण्यासाठी आणि मानवी आरोग्याला इजा पोहोचवणाऱ्या रंगांना फाटा देण्यासाठी सोलापुरात 12 वर्षांपूर्वी एक रोपटे लावले गेले, त्याचे नाव 'इको फ्रेंडली क्लब'. यंदा या क्लबच्या सामाजिक कार्याला 12 वर्षे पूर्ण होत असून, आपल्या पर्यावरणपूरक सेवेची 'तपपूर्ती' हा क्लब यंदाही 'नैसर्गिक रंगांच्या' स्टॉलद्वारे साजरी करत आहे.
केवळ आवाहन नाही, तर कृतीवर भर!
"इको फ्रेंडली सण साजरा करा" असे केवळ आवाहन करून बदल घडत नाही, तर त्यासाठी पर्याय उपलब्ध करून देणे आणि कृती करणे गरजेचे आहे, या विचारातून इको फ्रेंडली क्लबची स्थापना झाली. गेल्या 12 वर्षांपासून सोलापूरकरांना इको फ्रेंडली क्लबतर्फे पर्यावरणपूरक रंग उपलब्ध करून दिले जात आहेत. रासायनिक रंग आणि पाण्याचा अतिवापर टाळून 'कोरडी रंगपंचमी' साजरी व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. रंगपंचमीसह पर्यावरणपूरक गणेशोत्सव, पर्यावरणपूरक दिवाळी आणि इतरही सण-उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे व्हावे यासाठी इको फ्रेंडली क्लब प्रयत्नशील आहे.
अशी झाली सुरुवात आणि प्रवास -
काचेरी आणि विषारी रंगांमुळे होणारी शारीरिक इजा रोखणे आणि पाण्याची बचत करणे हा मूळ उद्देश घेऊन इको फ्रेंडली रंगांचा स्टॉल सुरू झाला. सामाजिक वनीकरण विभाग आणि इको फ्रेंडली क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंग तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देऊन जनजागृती करण्यात आली. सुरुवातीला छोट्या स्वरूपात सुरू झालेल्या या उपक्रमाला आता हजारो स्मार्ट सोलापूरकरांनी पसंती दर्शवली आहे.
--
आम्ही केवळ जनजागृती करून थांबलो नाही, तर सोलापूरकरांना नैसर्गिक रंग सहज उपलब्ध करून दिले. गेल्या 12 वर्षांपासून मिळणारा प्रतिसाद हा आमच्या पर्यावरण साधनेचाच एक भाग आहे. रंगपंचमीसह आपले सर्वच सण - उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
— सरस्वती नारायणकर-कोकणे,
इको फ्रेंडली क्लब
--
यंदाही निसर्गप्रेमींसाठी खास सोय
यंदाच्या 12 व्या वर्षीही जुळे सोलापुरातील दावत चौक येथे पर्यावरणपूरक रंगांचे स्टॉल सज्ज झाले आहे. सोलापूरकरांनी त्वचेला आणि डोळ्यांना घातक ठरणारे रासायनिक रंग टाळून, 'इको फ्रेंडली' कोरड्या रंगांनी ही रंगपंचमी साजरी करावी, असे आवाहन क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.