07/08/2025
शाडू माती म्हणजे परवाना नाही!
* खाडीत विसर्जनाने पर्यावरण धोक्यात"
ठाणे : प्रतिनिधी
"शाडू मातीची मूर्ती पर्यावरणस्नेही असते, म्हणून ती खाडीत विसर्जन केल्यास काहीच हानी होत नाही" – असा गैरसमज अजूनही अनेकांच्या मनात ठाण मांडून बसला आहे. मात्र वास्तव हे आहे की, शाडू माती देखील जर मोठ्या प्रमाणात खाडीत विसर्जित केली गेली, तर ती जैवविविधतेला धोका निर्माण करू शकते. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना एक भावनिक निवेदन देण्यात आले आहे.
गणेशोत्सव काळात पर्यावरणाच्या दृष्टीने POP (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्तींना विरोध होतो, हे योग्यच. मात्र त्याचवेळी शाडू मातीच्या नावाखाली खाड्यांमध्ये मूर्ती विसर्जन केल्यास जलप्रवाहावर, मत्स्यसंपदेवर आणि समुद्री जैवसाखळीवर नकारात्मक परिणाम होतो, हे लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.
शाडू माती ही जरी नैसर्गिक असली, तरी ती नदीच्या काठावरून आणलेली चिकणमाती असते. जेव्हा ती खाडीत मिसळते, तेव्हा त्या खाऱ्या पाण्यात तिचं विघटन फारसं झपाट्यानं होत नाही. परिणामी, मोठ्या प्रमाणावर विसर्जन झाल्यास गाळ वाढतो, पाण्याचा प्रवाह अडतो आणि मासळीचं नैसर्गिक अधिवास बाधित होतो. याशिवाय मूर्तींसोबत टाकले जाणारे रंग, हार, कापड, थर्मोकोल, प्लास्टिक हे तर थेट प्रदूषणाला आमंत्रण मिळत असल्याचे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांनी सांगितले
"शाडू माती म्हणजे मूळात पर्यावरणपूरक – ही गोष्ट खरी आहे. पण ती खाडीत टाकली तर तिचं पर्यावरणस्नेहीपण संपतं. नैसर्गिक वस्तूंचा गैरवापर झाला, तर त्याचा परिणाम तितकाच घातक ठरतो." – असं मत पर्यावरण अभ्यासक आणि वरिष्ठ पत्रकार प्रशांत सिनकर यांनी व्यक्त केलं.
*
केंद्र सरकारने ठाणे खाडीला "रामसर" स्थळाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे खाडीत प्रदूषण रोखणे हे प्रत्येकाचेच आद्य कर्तव्य आहे. प्रशासन वारंवार कृत्रिम तलावांचा वापर करण्याचं आवाहन करतं आहे. घरगुती विसर्जन, टाकाऊ मातीचा पुनर्वापर, जलकुंड, आणि ‘घरातच विसर्जन’ हे पर्याय उपलब्ध असताना खाड्यांमध्ये मूर्ती विसर्जन करण्याचं कुठलंच पर्यावरणीय कारण उरत नाही.
डॉ. नागेश टेकाळे (ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ)
गणेशोत्सव हा उत्सव निसर्गाशी सुसंवादी राहिला, तरच त्याचा खरा अर्थ साध्य होईल. त्यामुळे ‘शाडू माती’चा वापर करा, पण तिचं ‘खाडी विसर्जन’ नको. पर्यावरणस्नेही होणं ही फक्त घोषणा नाही – ती कृतीत उतरवायची जबाबदारी आपल्या सर्वाची आहे. ठाणे खाडी वाचली तर तिथली जैवसाखळी उत्तम राहील.
डॉ. प्रशांत सिनकर (पत्रकार आणि पर्यावरण अभ्यासक)...