10/07/2026
ठाण्यात घराचा भाग कोसळल्याने चिमुरड्याचा मृत्यू, दोन जण जखमी,आझाद नगर भागातील घटना
Thane : ठाण्यातील आझाद नगर, ब्रम्हांड भागातील मद्रास चाळीत आज दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. येथील एका २५ ते ३० वर्ष जुन्या तळ+१ मजल्याच्या घराच्या गॅलरीचा काही भाग बाजूच्या घरावर कोसळला. दुर्दैवाने, या दुर्घटनेच्या वेळी घरात तीन व्यक्ती झोपलेल्या होत्या. या ढिगाऱ्याखाली दबल्याने एका १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला असून, अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज १० जुलै २०२६ रोजी दुपारी १५:३५ वाजता ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला या घटनेची वर्दी मिळाली.
या दुर्घटनेत जयकुमार जयस्वाल (वय अंदाजे १२ वर्ष) या मुलाला गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर श्रीमती उर्मिला जयस्वाल (वय अंदाजे ३५ वर्ष) आणि विनीत जयस्वाल (वय अंदाजे ९ वर्ष) हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या दोघांवर मानपाडा येथील टायटन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हे घर मनिषा सावंत यांच्या मालकीचे असून ते बरेच जुने असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी लहू पाटील, उपआयुक्त दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय. एम. तडवी यांच्यासह कापूरबावडी पोलीस, बाळकुम अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती प्रतिसाद दलाचे (TDRF) जवान घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेचा उपाय म्हणून मद्रास चाळीतील बाजूची ३ घरे तातडीने रिकामी करण्यात आली असून तिथे धोकापट्टी (Danger Tape) बांधण्यात आली आहे. पुढील कारवाई माजीवाडा प्रभाग समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभागामार्फत सुरू आहे.
#ठाणे