06/07/2026
लॅबइंडिया इन्स्ट्रुमेंट्सची हरित ऊर्जा क्षेत्रात मोठी झेप; देशभर उभारणार ईव्ही फास्ट चार्जिंग नेटवर्क!
ठाण्यामध्ये पहिल्या आधुनिक 'लॅबइंडिया ईव्ही फास्ट चार्जिंग स्टेशन'चे उद्घाटन
ईव्ही क्षेत्रातील अग्रणी 'सस्टेनर' कंपनीसोबत धोरणात्मक भागीदारी
ठाणे: ठाण्यातील इलेक्ट्रीक कार वाल्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण, नाशिक हायवेजवळ माजीवडा येथे एक नवीन फास्ट ईव्ही कार चार्जिंग स्टेशन सुरू झाले आहे. ठाण्यातील 'लॅबइंडिया इन्स्ट्रुमेंट्स' या कंपनीने आता हरित ऊर्जा क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) देशव्यापी 'फास्ट चार्जिंग नेटवर्क' उभारण्याची घोषणा केली असून, या माध्यमातून आपल्या पारंपरिक व्यवसायाबाहेर प्रथमच मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी लॅबइंडिया इन्स्ट्रुमेंट्सने ठाण्यातील ईव्ही चार्जिंग सुविधा क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'सस्टेनर' (Sustener) सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. ईव्ही कार चार्जिंग उदघाटनाला फॉर्मुला ४ कार रेसर आणि अशोका पुरस्कार विजेत्या मनिषा केळकर उपस्थित होत्या. ईलेक्ट्रीक कार ही आता काळाची गरज आहे, आणि कंपन्यांनी देखील त्यांच्या सीएसआर फंडातून ईव्ही चार्जिंग स्टेशन सर्वत्र उभारण्याची गरज आहे. जेवढे चार्रिंग स्टेशन वाढतील तेवढा या कारचा खप वाढेल, जेणेकरून प्रदुषण देखील कमी होणार आहे, असे मनिषा केळकर यानी सांगितले.
कंपनीचे अध्यक्ष श्रीराम भालेराव यावेळी म्हणाले, सध्या संपूर्ण जगाची वाटचाल स्वच्छ आणि हरित ऊर्जेकडे सुरू असताना, आमच्या तांत्रिक कौशल्याच्या बळावर भारतभर जागतिक दर्जाचे आणि विश्वासार्ह ईव्ही चार्जिंग नेटवर्क उभारण्याचा आमचा संकल्प आहे."
लॅब इन्फ्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. रोहन भालेराव यांनी सांगितले की, "इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या धोरणांमुळे देशात ई-मोबिलिटीला मोठी चालना मिळत आहे. आम्ही भारतीय ग्राहकांना जलद, सुरक्षित आणि अखंड चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहोत."
ठाण्यात सुरू करण्यात आलेले हे फास्ट चार्जिंग स्टेशन म्हणजेच कंपनीच्या देशव्यापी विस्तार योजनेतील पहिले पाऊल आहे.