22/08/2025
उदगीर तालुक्यातील अतिवृष्टीचा फटका बसलेल्या बोरगाव धडकनाळ नागरिकांना माझी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजीराव हूडे यांच्या पुढाकारातून ,
माणुसकीच्या आधारावर उभं राहिलं उदगीर – व्यापाऱ्यांच्या मदतीने ८७ संसारांना नवी ताकद”
उदगीर :निसर्ग जेव्हा रौद्ररूप धारण करतो, तेव्हा माणसाचे अस्तित्वच डळमळीत होते. धडकनाळ आणि बोरगाव या दोन गावांवर आलेल्या अतिवृष्टीने असेच चित्र उभं केलं. घरं पाण्यात वाहून गेली, भिंती ढासळल्या, शेतजमिनी खरडून गेल्या, जनावरे मृत्युमुखी पडली. आयुष्यभराचा संसार डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होताना गावकरी हतबल झाले. पोळ्याच्या सणाच्या उंबरठ्यावर आलेल्या या आपत्तीने गावकऱ्यांच्या मनात काळोख पसरला.
पण अशा काळोखातही एक प्रकाशझोत चमकला – तो म्हणजे उदगीरच्या व्यापारी बांधवांचा!
स्वार्थ, राजकीय मतभेद, व्यवसायाच्या स्पर्धा या सगळ्याला बाजूला सारून या व्यापाऱ्यांनी माणुसकीच्या नात्याने गावकऱ्यांना आधार दिला. “संकटात साथ देणारा तोच खरा आपला” हे वचन त्यांनी कृतीत उतरवलं.
माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव हुडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सचिन इंटरनॅशनल प्रोटीन्स, नारायणा ऍग्रो ऑईल, वैशाली ऍग्रो सोया प्रॉडक्ट, दाल मिल असोसिएशन, आडत व्यापारी वेल्फेअर असोसिएशन यांच्यासह उदगीरच्या असंख्य व्यापाऱ्यांनी एकजुटीने मदतीचा हात पुढे केला.
संदीप सावकार मुक्कावार, सागर महाजन, संदीप शिवाजीराव हुडे, सुदर्शन मुंडे, निजवंते सावकार, लक्ष्मीकांत चिकटवार, संतोष मलगे, आदिनाथ कोरे, दत्ता बिरादार, वैजनाथ बिरादार, विनोद टवानी, कल्पेश माहिती, ज्ञानेश्वर पंदीलवार, कोंडीराम काळोजी, बाळू लासूणे, मल्लिकार्जुन काळगापुरे, पी.पी. पाटील, श्रीधर बिरादार, दिलीप पाटील, बबलू काळगापुरे, अंकुश बिरादार, चंद्रकांत टेंगेटोल, लकी पाटील, नागेश आंबेगावे, शिवशंकर बिरादार, जगदीश बाहेती, रवींद्र कोरे, शिवा पेठे, साईनाथ कल्याणी, मनोहर बिरादार, मारुती कडेवार आणि मुन्ना पेन्सिलवार यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांनी गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि तात्काळ आर्थिक मदत केली.
जवळपास ८७ गरजू कुटुंबांना मिळालेली ही मदत फक्त काही रुपयांची नव्हती, तर ती होती उभं राहण्याची ताकद, जगण्याची प्रेरणा आणि दुःखात कोणी तरी आपलं आहे हा दिलासा.
गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू होते – पण ते हताशेचे नव्हते, तर कृतज्ञतेचे होते. व्यापारी बांधवांच्या या संवेदनशील पावलाने गावकरी गहिवरून गेले. “अशा कठीण प्रसंगी आम्हाला सोडून दिलं नाही, हीच खरी संपत्ती” असे उद्गार ग्रामस्थांनी व्यक्त केले.
हा प्रसंग पुन्हा एकदा अधोरेखित करतो की –
👉 सत्ता क्षणभंगुर असते, संपत्ती येते-जाते... पण माणुसकी सदैव टिकून राहते.
👉 संकट काळात दिलेला हात, आयुष्यभर विसरता येत नाही.
उदगीरच्या व्यापारी बांधवांनी दाखवलेली ही माणुसकीची ऊब केवळ धडकनाळ आणि बोरगावपुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या समाजाला पुन्हा सांगते – “तोपर्यंत भारत, जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे!”