10/12/2025
काही दिवसांपूर्वी एक तरुण आला होता. रात्रीचे अडीच वाजले होते. अंगावर कुठे जखम नाही, कुठे रक्त नाही, सूज नाही. अंगात जॅकेट, महागडे शूज, मनगटावर घड्याळ होतं, बऱ्या घरातला असावा. श्रीमंत लोक अशा अवेळी सरकारी दवाखान्यात काही गुन्हा किंवा चुकीचं घडलं तरच येतात.
तो तरुण रुग्ण वाटतच नव्हता. भिंतीवरील घड्याळाकडे पहात मी विचारलं, "काय झालंय?
तो काहीच बोलला नाही तसं पुन्हा विचारलं, "काय झालंय तुम्हाला? रात्री अडीच वाजता का आलात?"
तरीही तो काहीच बोलला नाही.
तो फक्त माझ्याकडे बघत होता. काय प्रकार आहे लक्षात येत नव्हतं. दारू वगैरे पिऊन आलाय की काय अशी शंका येऊन थोडा पुढं सरकलो, अंदाज घेतला पण तसंही काही नव्हतं.
मागं सरकत पुन्हा थोडं मोठ्यानं विचारलं, "काय झालं सांगा?"
पुढच्याच क्षणी तो तरुण माघारी फिरला आणि काहीच न बोलता दरवाजातून बाहेर पडला. हा काय प्रकार आहे म्हणून बाजूच्या डॉक्टरांकडे पाहिलं तर त्यांच्याही चेहऱ्यावर आश्चर्य होतं. तो दोन पावलं चालत बाहेर गेला, तो पुन्हा परत आला आणि म्हणाला,
"डॉक्टर मला इथून जाऊ देऊ नका!"
तो नेमकं काय म्हणतोय हे लक्षात येत नव्हतं म्हणून विचारणार तोच तो तरुण बोलला,
"मला इथून जाऊ देऊ नका सर! मी इथून बाहेर गेलो तर माझी बॉडी परत येईल! मला आत्महत्या करायचीय!"
ते वाक्य ऐकून आणि त्याच्या नजरेतील निर्धार बघून नकळत मणक्यातून एक थंड लहर गेली... कारण तो खोटं बोलत नव्हता!
त्याला म्हटलं, "आधी बसून घ्या."
तो नाही बसला. त्या प्रसंगाला कसं हँडल करायचं काही लक्षात येत नव्हतं. तोंडातून वाक्य पडलं,
"मी तुमची काय मदत करू?" तसं तो एक नाव घेत म्हणाला,
"त्या डॉक्टरांना बोलवा... प्लीज आत्ता बोलवा!"
त्याने ज्या डॉक्टरचं नाव घेतलं, ते सायक्याट्रीचे रेसिडेंट डॉक्टर होते. त्याचे हात थरथरत होते. पापण्यांची उघडझाप वाढली होती. प्रचंड अस्वस्थ दिसत होता तो.
तो पुढे बोलू लागला,
"मी खूप अडचणीत आहे डॉक्टर, खूप थकलोय. मी डिप्रेशन मध्ये आहे, माझ्या मनात आत्महत्येचे विचार येतात आणि त्यासाठी माझी त्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट सुरू आहे. त्या डॉक्टरांनी एकदा सांगितलं होतं... आयुष्यात स्वतःला संपवायचा अगदी टोकाचा विचार आलाच तर फक्त एकदा मला संपर्क कर, मी कुठूनही येतो! आज ती वेळ आलीय सर, म्हणून मी आलोय. मला जगायचंय पण स्वतःला थांबवू शकत नाही... मला इथून जाऊ देऊ नका नाहीतर इथंच माझं पोस्टमार्टम होईल."
तो शुद्धीत होता, तो खोटं बोलत नव्हता, धमकीही देत नव्हता. तो आतून संपला असावा. पुढच्या क्षणी त्या डॉक्टरांना त्यावेळी फोन केला आणि परिस्थिती सांगितली. ते सायक्याट्रिस्ट एकच म्हणाले,
"मला माहीत आहे तो पेशंट. मी पंधरा मिनिटात पोहोचतो, एका क्षणासाठी सुद्धा त्याला तुमच्या नजरेसमोरून बाजूला होऊ देऊ नका... नाहीतर आज जाणार तो."
फोन ठेवला आणि नजरेनेच त्याला खाली बसायला सांगितलं. तसं त्यानं खिशातून काहीतरी काढलं... हातात सिगारेट होती. त्याला म्हटलं, "ही जागा नाही याची."
ते ऐकून तो माघारी वळला आणि बाहेर जाऊ लागला, परिस्थिती अवघड झाली होती. खरंतर मीच घाबरलो होतो... कारण मला माहीत होतं ... 'हा आत्महत्या करण्यासाठी जातोय'!
पुढच्या काही क्षणात तो कुठेतरी निघून गेला आणि पटकन सिक्युरिटीला त्याला शोधायला सांगितलं. तो मधला काळ हृदयाची प्रचंड धडधड वाढवणारा होता. पाच मिनिटांनी गार्ड त्याला घेऊन आले, तेव्हा जीवात जीव आला. तो समोर उभा होता, त्याच्या हातातील सिगरेट त्याने अजून पेटवलेली नव्हती. डोळे भरून आले होते... मनात काहीतरी प्रचंड सुरू असावं... स्वतःशीच भांडत असावा कदाचित... पण त्याला मार्ग मिळत नसावा!
त्याला खुर्चीत बसवलं. मला कसंही करून तो पंधरा मिनिटांचा 'काळ' पुढं ढकलायचा होता. त्याला नाव विचारलं, गाव विचारलं, काम विचारलं. तेव्हा समजलं की तो एका आयटी कंपनीत मोठ्या पगाराच्या नोकरीवर होता. पाच महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं आणि डिव्होर्सची प्रक्रिया सुरू होती! कौटुंबिक वादातून तो नैराश्यात गेला होता.
त्याला प्रश्न विचारत गेलो, हळूहळू तो बोलू लागला, व्यक्त होऊ लागला. बोलतेवेळी डोळ्यातून पाणी येत होतं. कौटुंबिक वादात एक तरुण उध्वस्त झाला होता. त्याचे मागे जाण्याचे किंवा पुढे सरकण्याचे दोन्ही रस्ते बंद झाले होते. त्याच्याच शब्दात 'आयुष्याचं गटार झालं होतं'! तब्बल वीस मिनिटं तो बोलला. काही गोष्टी त्याला समजावून सांगितल्या, तोही व्यक्त झाला. गेल्या काही महिन्यात तो कधीच, कोणाशीच हे बोलला नव्हता... आतल्या आत कुढत होता. कदाचित त्याला कोणी हे विचारलंही नसावं!
थोड्या वेळाने ते डॉक्टर आले. त्यांना पाहताच तो उभा राहिला. ते डॉक्टर त्याला घेऊन गेले. मनावरचं ओझं कमी झालं. तो मरण्याच्या निर्धारने आला होता आणि त्याला आपण पंधरा-वीस मिनिटं लांबवलं याचा आनंद होता. पुढच्या पाच-दहा मिनिटांत ते डॉक्टर त्या तरुणाला घेऊन परत आले आणि म्हणाले,
"सर, मी औषधं वगैरे लिहून दिली आहेतच पण हे सांगा की, तुम्ही याला काय बोलले?"
"काही नाही जरा गप्पा मारल्या." मी
तसं ते डॉक्टर म्हणाले, "तो म्हणतोय की, आता त्याच डॉक्टरकडून पुढचे उपचार घ्यायचेत." ते ऐकून चेहऱ्यावर हसू आलं.
तो तरुण पुढे होत म्हणाला,
"सर आत्ताच या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही लेखक आहात आणि ती वेब सीरिज तुमची आहे."
"मी लेखक वगैरे काही नाही, दोन-तीन पुस्तकं आहेत माझी." मी म्हणालो
"तुमच्याकडं बघून वाटत नाही?" तो
"कोणालाच वाटत नाही." मी
तसं तो हसून म्हणाला,
"सर तुमची वेब सिरीज आवडली पण आणखी चांगली बनवता आली असती. मी डॅन ब्राऊनचा खूप फॅन आहे, त्याची सगळी इंग्लिश पुस्तकं वाचली आहेत. अशा सिरीज आपल्याकडे यायला पाहिजेत."
त्यावेळेस कळलं की त्याचं वाचन प्रचंड होतं. अर्ध्या तासापूर्वी आत्महत्या करण्यासाठी आलेला 'तो रुग्ण' आणि समोरचा 'हा तरूण' हे दोघे एकच वाटत नव्हते. एक चांगला पोरगा आज नैराश्यात जाऊन मरायला निघाला होता. त्याला वाचवण्यात अर्धा टक्का तरी देता आला हा आनंद फार छान होता.
तो तरुण म्हणाला,
"पहाटे तीन वाजता एका लेखकाला द्यायला माझ्याकडे एकच एक गोष्ट आहे." असं म्हणून त्यानं खिशातून पेन काढला आणि माझ्या हाती दिला. मीही कसलाही नकार देता तो पेन ठेवून घेतला.
तो परत जायला निघाला तसं सायक्याट्रीचे डॉक्टर म्हणाले,
"पुढच्या वेळेस आलास की माझ्याकडे येऊच नकोस... याच डॉक्टरांना दाखव."
तसं तो हसून म्हणाला,
"आता पुढच्या वेळेस येण्याची गरजच पडणार नाही!"
आमच्याकडे नेहमी वाईटच गोष्टी घडत नाहीत, कधीतरी एखादी फार छान, आनंदाची, समाधानाची गोष्टही घडते. तो तरुण आणि त्यांनं प्रेमानं दिलेली ही भेट कधीच विसरणार नाही...
- डॉ. प्रकाश कोयाडे