24/02/2025
वेध अहिल्यादेवींचा...
प्रेरक चरित्राचा...!
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती त्रिशताब्दी वर्ष (१७२४ - २०२४)
चरित्र गुणवर्णन लेख मालिका भाग - १४०
"कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर आणि श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज"
महेश्वरच्या भूमीमध्ये शिवरायांचा असा वारसा,
राजयोग हा कसा असावा रयतेपुढती स्वच्छ आरसा, लोकहितास्तव राज्य समर्पण योगीपणाची कृती
कर्तव्याची अक्षय पूर्ती, जपली अनंत नाती
कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर
१. लोककल्याणकारी राज्यकारभार करून आदर्शपणे राज्य चालविले. प्रजेला पुत्रवत मानले.
२. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आदर्श राज्य निर्माण केले. प्रजाहितदक्ष राज्यकारभार केला.
३. सासरे मल्हारराव होळकर वगळता पती, पुत्र यांचे सुख फारसे लाभले नाही. मल्हाररावांच्या मृत्युनंतर गणगोतांचा फारसा पाठिंबा मिळाला नाही.
४. जिजाऊ माँसाहेब वगळता इतर गणगोतांचा विरोध सहन करावा लागला. स्वकीयांनी केलेला विरोध मोडून काढून, त्यांच्याशी संघर्ष करून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.
५. प्रजा अहिल्याबाईंचा "पुण्य-श्लोक", "देवी", 'लोकमाता' या रूपात गौरव करीत असे.
६. शिवप्रभुंना प्रजा "जाणता राजा" समजत होती. प्राणांची बाजी लावून शत्रूबरोबर लढत होती.
७. अहिल्याबाई हृदयाने कारुण्यमूर्ती पण न्यायनिष्ठुर होत्या. त्यांचा न्याय-निवाडा राज्य-व्यवहारात दोन्हीही पक्षांना मान्य होत असे. "अहिल्या-न्याय" हे होळकरशाहीचे वैशिष्ट्य होते.
८. निरपेक्ष निर्भीड न्यायासन हे शिवशाहीचे वैशिष्ट्य होते.
९. पुत्र मालेरावाने वेडसरपणा करताच त्याला शिक्षा केली.
१०. थोरातांच्या कमळेबाबत युवराज संभाजींनी न शोभणारे वर्तन करताच शिवरायांनी त्यास नजरकैदेत ठेवून शिक्षा केली.
११. राज्यावर तुळशीपत्र ठेवून श्रीशंकराच्या नावाने अहिल्याबाईंनी राज्यकारभार केला. त्या राजयोगिनी होत्या.
१२. अहिल्याबाई हिंदू धर्माच्या परम अभिमानी होत्या. पण त्यांच्या राज्यात हिंदू-मुसलमान आणि इतर धर्मीयही सुखात आणि शांततेत नांदत होते. निजाम आणि टिपूच्या राज्यातील मुस्लिम प्रजाजन अहिल्याबाईच्या राज्यात येऊन राहिले होते.
१३. अहिल्याबाईंनी शेजारी राज्यांशी चांगले संबंधी प्रस्थापित केले. ३० वर्षे शांततेत राज्यकारभार केल्यामुळे राज्यातील प्रजेला शांतता, स्थैर्य व सौख्य लाभले.
१४. आणीबाणीच्या प्रसंगासाठी त्यांनी महिलांच्या सैन्याची तुकडी तयार केली होती. राघोबा पेशवे यांच्या आक्रमणाची चाहूल लागताच आपले स्त्री-सैन्य लढण्यासाठी सिद्ध ठेवले होते.
१५. अहिल्याबाईंचे चारित्र्य पाण्यासारखे पारदर्शी आणि देवतेप्रमाणे पवित्र होते. "गंगाजळनिर्मळ मातोश्री" असं पेशवे त्यांना संबोधित. अहिल्याबाई हा नितळ, निरामय आयुष्याचा वस्तुपाठ होता.
१६. अहिल्याबाईंच्या दीर्घ शासन-काळात त्यांनी शेती, व्यापार संरक्षण याबाबतीत लोकहिताची धोरणे राबविली.
श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज
१ "हे राज्य श्रींचे आहे" अशी शिवप्रभुंची धारणा होती. ते राजयोगी होते.
२. शिवाजी महाराज हिंदुत्वाचे परम अभिमानी होते. पण त्यांनी धर्माच्या बाबतीत भेदाभेद केला त्यांच्या राज्यात हिंदू-मुसलमान व इतर यांच्याबाबत सर्वधर्म-समभाव होता. त्यांचा शरीररक्षक मदारी मेहतर हा मुसलमान होता सैन्यातील अनेक अधिकारी आणि सैन्यदलात मुसलमान होते.
३. शिवरायांचे परराष्ट्रधोरण सतर्क, सावध होते. राज्य रयतेचं व्हावं आणि राज्यातील प्रजा सुखी व्हावी हे त्यांचं धोरण होतं.
४. 'गनिमी कावा' हे त्यांच्या युद्धनीतीचं प्रमुख अस्त्र होतं. महाराष्ट्रातील डोंगराळ प्रदेशाला अनुसरून त्यांनी ही रणनीती अवलंबिली होती या गनिमी काव्यामुळे त्यांनी बलाढ्य मोगल सैन्याशी यशस्वीपणे झुंज दिली.
५. त्यांचे वैयक्तिक चारित्र्य म्हणजे 'राजाचे चारित्र्य शुद्ध असावे' या वचनाचा आदर्श वस्तुपाठ होता. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला त्यांनी सन्मानाने तिच्या घरी पोहोचवून दिले. स्त्रीत्वाचा आदर केला.
६. शेती, व्यापार, संरक्षण, भाषा, साहित्य संस्कृती अशा सर्व बाबतीत शिवाजी महाराज सजग होते. 'आज्ञापत्र' लिहून त्यांनी लुटमार करणाऱ्या भिल्लांचे पुनर्वसन केले. त्यांना सीमारक्षणाचे काम दिले आणि उदरनिर्वाहासाठी शेती दिली.
७. राज्यकर्ता म्हणून आपल्या प्रगल्भ विचारांची व्याप्ती सिद्ध केली आहे.
८. मोरोपंत, अनंतफंदी, पंडित खुशालीराम भट्ट अशा विद्वानांचा गौरव केला. लोकांच्या कल्याणाचे निर्णय घेऊन सामाजिक न्याय, नीती या मूल्यांची लोकमानसात रुजवण केली. संकटाचे वेळी महादजी शिंदे यांना मदत करून उत्तर भारतात देशी आणि परदेशी शत्रूशी मुकाबला केला. देशभरात विविध ठिकाणी लोककल्याणाची कामे सिद्ध करून राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे काम केले.
९. देशभरात ठिकठिकाणी लोक-निर्माणाची अनेक कामे केली. त्याकरिता योग्य व्यक्तींची निवड करून कामांची निर्मिती केली. राज्यकारभारातही कर्तृत्ववान माणसे नेमून कारभार गतिमान नि लोकाभिमुख केले.
१०. राज्यात समर्थ रामदास, संत तुकाराम अशा संतांच्या मदतीने लोकजागरणाचे काम केले. लोकांच्या मनात परकी शत्रूच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण केली. 'मराठा तितुका मेळवावा' हे ब्रीद स्वीकारून राष्ट्रबांधणीचे काम केले.
११. महाराष्ट्रात गड, किल्ले यांची निर्मिती केली. योग्य माणसाला योग्य काम हे त्यांचे धोरण होते. म्हणूनच अष्टप्रधानात बुद्धिवादी वर्ग आणि लढाईच्या मैदानात मर्द मावळे असे त्यांचे नियोजन होते. त्यांचा राज्यकारभार लोकाभिमुख होता.
-------------------------------------------------------------------
संकल्पना :
संस्कार भारती, पश्चिम प्रांत
शब्दांकन : श्रीमती राजश्री शिखरे
मातृविधा संयोजिका, संस्कार भारती, पश्चिम प्रांत.