22/01/2023
ग्रूव्हज इंडियन बँडची पुण्यात घोषणा
- ड्रीम मर्चंट्स इंफोटेन्मेन्टस आणि रीच मीडियाचा संयुक्त उपक्रम
पुणे : विविधतेमध्ये एकता ही संकल्पना भारतासाठी नवी नाही, परंतु हीच संकल्पना संगीताच्या माध्यमातून नव्या आविष्कारासह रसिकांसमोर घेऊन येण्याच्या उद्देशाने निर्माण होत असलेल्या ग्रूव्ह्ज इंडियाना या बँडची नुकतीच पुणे येथे घोषणा करण्यात आली. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष मा. स्वप्नील बापट आणि खुशी एम्बिएन्ट मीडिया सोल्युशन्सचे संतोष शिंदे यांच्या हस्ते बँडच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
धग या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटाच्या संगीताने आपल्या सांगीतिक कारकिर्दीचा प्रारंभ करणारे संगीतकार आदि रामचंद्र यांच्या संकल्पनेतून या बँडची निर्मिती झाली आहे. भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र भाषा, संस्कृती, साहित्य आणि संगीत आहे. हे सर्व शब्द आणि सूर यांच्या माध्यमातून एकत्र गुंफत संपूर्ण भारताचा सांगीतिक पट विणण्याच्या उद्देशाने या बँडची निर्मिती करण्यात आली असून, युवा पिढीसह सर्व रसिकांना भावेल असे याचे स्वरूप असेल असे यावेळी आदि रामचंद्र यांनी स्पष्ट केले. यासाठी प्रत्येक प्रांतातील प्रसिद्ध कलाकारांना सोबत घेऊन प्रत्येक प्रदेशाच्या मातीतील संगीत आणि साहित्य बँडमध्ये अंतर्भूत करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे संपूर्ण देशातील कलाकार या सांगीतिक प्रवासात सहभागी होतील आणि ही स्वरयात्रा भारताची विशेष ओळख बनेल. म्हणूनच "आपली भाषा आपला प्रदेश, आपले संगीत आपला बाणा; ग्रूव्ह्ज इंडियाना" अशी अर्थपूर्ण स्लोगन घेऊन हा बँड शब्दस्वरांच्या धाग्यात आपल्या बहुरंगी संगीताची आणि संस्कृतीची माळ ओवण्यास सज्ज झाला आहे.
समकालीन संगीतावर केवळ तालप्रधान असल्याची, कानठळ्या बसवणारा धांगडधिंगा असल्याची आणि अर्थपूर्ण, गहिऱ्या शब्दांशी फारकत घेतलेले संगीत म्हणून टीका होते. बहुतांश बँड्स तरुणाईला आकर्षित करण्यासाठी याच प्रकारचे संगीत निर्माण करत असल्याचीही टीका होते. अभिजात भारतीय संगीताचे भोक्ते बहुधा बँड्समधील संगीतापासून दूर राहणे पसंत करतात. ग्रूव्ह्ज इंडियाना हा बँड सगळे बँड्स आणि मातीशी इमान राखणारे अस्सल भारतीय संगीत यांच्यामधील दरी सांधणारा पूल बनू शकेल. कारण, या बँडमध्ये युवा प्रेक्षकांना पसंत पडेल असे सादरीकरण आणि उत्तम शब्द आणि अस्सल भारतीय संगीतातील सूर यांचा मेळ घातला जाणार आहे, असे आदि रामचंद्र यांनी स्पष्ट केले.
ग्रूव्ह्ज इंडियाना बँडमध्ये सुप्रसिद्ध बासरीवादक अमर ओक, गिटारवादक मिलिंद शेवरे आणि अभिलाष राजर्षी, तालवाद्यांसाठी अनिरुद्ध देशपांडे आणि कार्तिक स्वामी, पाश्चिमात्य तालवाद्यांसाठी पर्कशनिस्ट केदार घोडके, ध्वनी तंत्रज्ञ हर्षद साठी, संगीत संयोजक अनय गाडगीळ असे वादक कलाकार तर सौरभ दफ्तरदार, स्वप्नजा इंगोले, आदि रामचंद्र अशा मुख्य गायक कलाकारांसहित इतर अनेक नवोदित गायक कलाकारांचा कलाविष्कार रसिकांसमोर सादर होणार आहे. लवकरच ग्रूव्ह्ज इंडियाना बँडचा शुभारंभाचा प्रयोग पुण्यात होणार असून, रसिकांना एक सुंदर शब्दस्वरानुभव देण्यास उत्सुक असल्याची भावना यावेळी कलाकारांनी व्यक्त केली.
ग्रूव्ह्ज इंडियानासाठी ओम साई कम्युनिकेशन्स आणि गौरव क्रिएशन्स हे इव्हेंट पार्टनर्स म्हणून, खुशी एम्बिएन्ट मीडिया सोल्युशन्स हे मल्टीप्लेक्स पार्टनर म्हणून तर फिरुया. कॉम हे ट्रॅव्हल पार्टनर म्हणून काम करतील. या कार्यक्रमासाठी गौरव क्रिएशन्सचे वैभव कानविंदे आणि खुशी एम्बिएन्ट मीडिया सोल्युशन्सचे संतोष शिंदे उपस्थित होते.