04/08/2022
#प्रसाद_प्रकाशन
#ग्रंथ_प्रकाशन
#अमृतमहोत्सवी_वर्ष
आपणा सर्वांचे प्रिय “प्रसाद प्रकाशन” यंदा ७५ वर्षांचे झाले. ०१ ऑगस्ट १९४७ पासून अखंड चालणाऱ्या प्रसादच्या वाड्मय प्रवासात आज आम्ही मैलाचा ७५ वा दगड गाठला आहे. पाऊण शतक अव्याहतपणे प्राचीन संस्कृतीची नव्याने ओळख करून देणारे ग्रंथ, आध्यात्मिक, पारमार्थिक, धार्मिक विषयांवरील, श्रद्धेला पूरक असणारी पण अंध:श्रद्धेकडे न झुकणारी पुस्तके, प्रसादचा मासिक अंक, अशा सर्व प्रकारच्या वाड्मयाची निर्मिती करणे, याच ध्येयाने प्रेरित अशी आमची “प्रसाद प्रकाशन” ही संस्था काम करते आहे.
प्रकाशन संस्था म्हटलं की डोळ्यापुढे येते ते पुस्तक छपाई करून ते प्रकाशित करणे, हे ठोकळेबाज चित्र. मात्र “प्रसाद प्रकाशन” याला अपवाद आहे. प्रसाद प्रकाशनचे संपादक परंपरेतील कै. मनोहर य. तथा बापूसाहेब जोशी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी कै. सौ. मंजिरी जोशी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ‘पुरस्कार वितरण आणि ग्रंथ प्रकाशन’ सोहळ्याचं आयोजन आमची संस्था करत असते. आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन त्यांचे कौतुक व नवोदितांना प्रोत्साहन देण्याचे काम या माध्यमातून आमची संस्था करत असते.
यंदाच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त पुरस्कार वितरण व ग्रंथप्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. या वर्षीचा कै. मनोहर य. तथा बापूसाहेब जोशी स्मृतीगौरव पुरस्कार सुप्रसिध्द प्रवचनकार, निरुपणकार व लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना, तसेच कै. मंजिरी मनोहर जोशी स्मृतीगौरव पुरस्कार प्रसिद्ध लेखिका व संस्कृत तज्ज्ञ डॉ. अंजली पर्वते यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण आणि पुस्तक प्रकाशन सोहळा दि. ०६ ऑगस्ट २०२२ या दिवशी आयोजित केला आहे.
हा कार्यक्रम संपूर्ण प्रसाद परिवाराचा आहे.....आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण ....अवश्य या..!
दि. ०६ ऑगस्ट २०२२, शनिवार सायंकाळी ०६ वाजता
गणेश सभागृह, गोळवलकर गुरुजी शाळा, टिळक रोड, पुणे