
26/08/2025
*"वसई विरार हवामान परिषद संपन्न"*
२५ ऑगस्ट २०२५
हवामान बदल व त्यामध्ये स्थानिकांची, शहरातील जनतेचा सहभाग यांना घेऊन दोन दिवसीय "वसई-विरार हवामान परिषद २०२५" निर्मळ येथील समाज सेवा मंडळ हॉल येथे पार पडली. वसई व परिसरातील १५० हून अधिक संस्था संघटना, अभ्यासक आणि शहर प्रतिनिधींना हवामान वास्तव आणि न्याय्य हवामान कृतीच्या संवादासाठी या परिषदेच्या निमित्ताने एकत्र आणले. जागतिक "टाउन हॉल सीओपी" पासून प्रेरित होऊन, परिषदेने वसई-विरारमधील पर्यावरणाचे प्रश्नांना लोकल ते ग्लोबल जोड देण्याबाबत चर्चा व कृती आराखड्यावर भर दिला.
हवामान परिषदेची सुरुवात "आपली वसई आपला विकास" मोहिमेचे कार्यकर्ते श्री. मॅकेन्झी डाबरे यांनी करताना "वसई विरारमधील पर्यावरण संघर्षांचा इतिहास मांडताना ग्रामीण भागातील हरित वसईची लढाई ते आता पुरात बुडणारी वसई हे वास्तव लक्षात घेता ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी पर्यावरण बदल लक्षात घेता आपल्या अस्तित्वाच्या दृष्टीने एकत्र येऊन अभ्यास वर्ग, पर्यायी नियोजन व जमिनीवरील लढाई यांची सांगड आवश्यक असल्याचे सांगितले. युवा संस्थेच्या शहर नियोजनकार दुलारी परमार यांनी लिहिलेल्या "शहरी संदर्भात जागतिक ते स्थानिक हवामान बदल" या सत्रात महाराष्ट्र हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे हवामान-संवेदनशील राज्य कसे आहे याची मांडणी केली. महाराष्ट्र राज्य हवामान बदल कृती आराखड्यातमध्ये (२०२०-२०३०) मुंबई आणि वसई सारख्या उपनगरीय भागांना हवामान बदलाचा सर्वात जास्त धोका कसा आहे यावर प्रकाश टाकण्यात आला. तर अभ्यासक दानिया डाबरे यांनी "वसई मधील हवामान धोक्याचे मॅपिंग" या सत्रात वसई-विरारमधील अलीकडील अभ्यासातील प्रमुख निष्कर्ष सादर केले. वसई मधील जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान ४४°C च्या उच्चांकासह अति उष्णतेचे पॉकेट्स असल्याचे नमूद केले. तुंगारेश्वर राखीव वनाच्या काही भागात भूस्खलनाची उच्च संवेदनशीलता नोंदवली गेली. वसई-विरारमधील सततचे वायू प्रदूषण अधोरेखित करताना बेसुमार बांधकामे, उघडे आरएमसी प्लांट आणि वाढती धूळ यामुळे हवेची गुणवत्ता बिघडत आहे. अनियोजित जलद शहरीकरणामुळे या प्रदेशातील मौल्यवान पाणथळ जागांचे लक्षणीय ऱ्हास झाल्याचे दिसून आले. या अभ्यासात उष्णता, पूर आणि भूस्खलन जोखीम क्षेत्रे एकत्रित करण्यासाठी, वस्त्यांचे सीमांकन करण्यासाठी आणि पुनर्वसन आणि पुनर्वसनासाठी सुरक्षित जमीन वाटप करण्यासाठी हवामान आणि शहर नियोजनाची तातडीची गरज अधोरेखित करण्यात आले.
वसई-विरारमधील हवामान बदलामुळे दैनंदिन संघर्ष कसा वाढतो याचे अनुभव विविध सामाजिक कार्यकर्ते व तज्ञ यांनी "शहरी हवामान कृती: आव्हाने आणि संधी" या विषयावर आयोजित पॅनेल चर्चेत व्यक्त केले. ज्यामध्ये महाराष्ट्र शासन हवामान कृती कक्षाच्या श्रुती पांचाळ, वास्तुविशारद आणि शहरी डिझायनर अनिरुद्ध पॉल, सामाजिक कार्यकर्ते समीर वर्तक, सचिन मर्ती, डॉमिनिका डाबरे, शशी सोनवणे, जॉन परेरा, युवाच्या कार्यकारी संचालक रोशनी नुग्गेहल्ली यांनी मांडणी केली. वसई मधील निकृष्ट रस्ते, अनियोजित बांधकामामुळे व भरावामुळे येणारे पूर, मूलभूत सेवांचा अभाव, महिला सुरक्षितता, अपुरी सार्वजनिक परिवहन व्यवस्था, सार्वजनिक शौचालयांचा अभाव, कमी दर्जाच्या व पगाराच्या नोकऱ्या, अनियंत्रित बांधकामांमुळे तलाव, भूजल, नष्ट होणारे तीवराची जंगले व पाणथळ जागा याबाबत माहिती देताना चिंता व्यक्त केली. "विकास" प्रकल्पांची खरी किंमत आदिवासी, शेतकरी, कामगार, स्थानिक व शहरी जनता मोजत असल्याचे सांगितले. निसर्गाकडे असेच दुर्लक्ष केले तर पुढील पिढी नैसर्गिक जीवनापेक्षा फक्त प्रदूषित शहरे वारशाने घेईल असे असे तज्ञांनी स्पष्ट केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसईतील तरुणांनी विशेष प्रयत्न केले. सदर कार्यक्रमासाठी समाज सेवा मंडळ, उत्तर वसई यांनी मोफत हॉल उपलब्ध करून दिल्याने पर्यावरण परिषद आयोजित करणे सोपे गेले.
अधिक माहितीसाठी संपर्क :
दानिया डाबरे : 70214 27617
धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻