12/09/2026
आज सण-उत्सवांवरची चर्चा डीजे, लाऊडस्पीकर आणि कर्मकांडांपुरती मर्यादित राहिलेली नाही. हा प्रश्न आपल्या लोकसंस्कृतीच्या मुळांचा, जातिव्यवस्थेचा आणि आपल्या जगण्याचा आहे.
आदिवासी, मूळ निवासी आणि बहुजन समाजांचं जगणं जल, जंगल, जमीन, शेती, निसर्ग आणि सामूहिक जीवनाशी जोडलेलं होतं. त्यांच्या अनेक लोकपरंपरा काळाच्या ओघात व्यापक धार्मिक चौकटीत सामावल्या गेल्या. या प्रक्रियेत सामाजिकदृष्ट्या वर्चस्व असलेल्या समूहांचा आणि धार्मिक संस्थांचा प्रभाव राहिला. स्थानिक देवता, श्रद्धा आणि सणांना नवे धार्मिक अर्थ मिळाले; काही परंपरांना मान्यता मिळाली, तर काहींचं स्थान आणि सामाजिक महत्त्व बदललं.
जातिव्यवस्थेने केवळ माणसांची सामाजिक उतरंड तयार केली नाही; ज्ञान, श्रद्धा, श्रम, संस्कृती आणि प्रतिष्ठेचंही असमान वाटप केलं. कोणाची परंपरा ‘उच्च’ आणि कोणाची ‘गावंढळ’, कोणाचा देव ‘मुख्य’ आणि कोणाची देवता ‘स्थानिक’, कोणाचं ज्ञान शास्त्र आणि कोणाचं केवळ लोकविश्व—या भेदांनी अनेक लोकपरंपरांना दुय्यम स्थान मिळालं.
पुढे बाजार, भांडवल आणि राजकारणही या उत्सवांमध्ये शिरलं. लोकजीवन आणि निसर्गाशी असलेला मूळ संदर्भ मागे पडत गेला आणि उत्सवाचं स्वरूप कर्मकांड, दिखावा आणि बाजाराकडे झुकत गेलं.
आज हेच सण पुन्हा जेव्हा त्याच उच्च वर्गातील पुरोगामी लोकाना डोईजड किंवा वर्तमान जीवनाशी विसंगत वाटू लागले आहेत. त्यामुळे धर्माच्या चौकटीतून बाहेर पडण्याची चर्चा होते आहे.
पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे
धर्मातील कर्मकांड आणि जातीय उतरंड नाकारताना आपण आपल्या लोकपरंपराही नाकारायच्या का?
की त्या परंपरांमधील निसर्गाशी, श्रमाशी आणि सामूहिक जगण्याशी जोडलेली मुळं पुन्हा शोधायची?
कारण आपल्या लोकपरंपरांची मुळं जल, जंगल, जमीन, देवराई, नदी, डोंगर, शेती आणि समूहजीवनात होती.
म्हसोबा, गिरोबा, वेतोबा, विठोबा, सातेरी, भूमका, आदिमाया, आदिशक्ती हे आपल्या लोकविश्वाचे भाग होते.
या परंपरांकडे केवळ धार्मिक कर्मकांड म्हणून पाहिलं तर त्यामागचं लोकजीवन दिसणार नाही. त्या परंपरांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा होती, निसर्गाशी नातं होतं आणि समूहाने जगण्याची पद्धत होती.
म्हणून एका धार्मिक चौकटीतच आपली संपूर्ण ओळख शोधण्याची गरज नाही. आणि जातीय उतरंडीत ज्यांना दुय्यम ठरवलं गेलं, त्यांनी स्वतःच्या लोकपरंपरांकडे कमीपणाने पाहण्याचीही गरज नाही.
आपण निसर्गावर श्रद्धा ठेवणारे लोक आहोत.
आपल्या अनेक समुदायांचं जगणं समूहाभोवती उभं होतं समूहाने शेती करणं, श्रम करणं, सुख-दुःख वाटून घेणं आणि एकत्र आनंद साजरा करणं.
म्हणून आजचा प्रश्न फक्त डीजेचा, लाऊडस्पीकरचा किंवा कर्मकांडांचा नाही.
हा जात, संस्कृती आणि जगण्याच्या हक्काचा प्रश्नही आहे.
आपल्या लोकसंस्कृतीला केवळ ‘लोककला’ म्हणून दाखवून तिच्या मुळाशी असलेल्या माणसांना मात्र सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुय्यम ठेवायचं, ही विसंगती आता स्वीकारता येणार नाही.
धर्माच्या चौकटीत अडकायचं नाही.
जातीय उतरंड स्वीकारायची नाही.
पण त्यातून बाहेर पडताना आपली मातीही सोडायची नाही.
आपल्या लोकपरंपरा आणि निसर्गाशी असलेलं नातं पुन्हा जिवंत करायचं आहे.
म्हणून पुढचा सण फक्त साजरा करू नका.
आपल्या गावची देवराई शोधा.
आपल्या गावचा जलस्रोत जपा.
ज्येष्ठांकडून स्थानिक देवता, लोककथा आणि परंपरा समजून घ्या.
ज्या समुदायांनी या परंपरा जिवंत ठेवल्या, त्यांच्या ज्ञानाला आणि श्रमाला प्रतिष्ठा द्या.
सणाच्या वर्गणीतला काही भाग गावच्या जल-जंगल-जमिनीसाठी द्या.
उत्सवात दिखाव्याऐवजी स्थानिक माणूस, स्थानिक कला, स्थानिक अन्न आणि स्थानिक निसर्गाला केंद्रस्थानी ठेवा.
आणि जिथे आपल्या मातीवर, नदीवर, जंगलावर किंवा समुद्रावर संकट येईल, तिथे फक्त देवासाठी नाही त्या देवाच्या भूमीसाठी उभे राहा.
म्हणून आता प्रश्न फक्त असा नाही की सण कसा साजरा करायचा.
प्रश्न असा आहे
आपण जातीय उतरंडीत अडकलेली ओळख जगणार?
बाजाराने विक्रीसाठी तयार केलेली संस्कृती जगणार?
की जल, जंगल, जमीन, श्रम आणि समतेशी जोडलेली आपली लोकसंस्कृती पुन्हा उभी करणार?
भक्त होऊन फक्त उत्सव साजरा करणार, की राखणदार होऊन आपलं जगणं वाचवणार?
तुम्ही ठरवा भक्त बनणार की राखणदार?