
01/09/2025
इ.स. १७६२ मध्ये श्रीमंत गणपतराव रास्ते यांनी महागणपतीचे भव्य व दिव्य मंदिर उभारले, तेव्हापासून वाईकरांच्या जीवनात गणपतीचे स्थान अधिकाधिक उंचावत गेले. गंगापुरीतील द्वारकेचा गणपती व त्याचा उत्सव इ.स. १८४८ पासून सार्वजनिक पद्धतीने साजरा होऊ लागला. त्यामुळे पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात होण्यापूर्वीच वाईच्या भूमीवर हा उत्सव जनमानसाला एकत्र आणत होता.
गणेशोत्सवापूर्वी साधारण आठ दिवस, म्हणजेच भाद्रपदातील गणेश चतुर्थीच्या अगोदर, वाईमध्ये गणपतीची द्वारे निघत असत. ‘द्वार’ म्हणजे मूळ स्वयंभू स्थानी विराजमान असलेल्या गणपतींची प्रतिमा चारही दिशांना नेऊन यात्रेच्या निमित्ताने गावोगाव दर्शन घडवून आणणे, आणि नंतर ब्राह्मणशाहीतील श्री गजाननांच्या दर्शनास पुन्हा गावात परत आणणे. या यात्रेत होणारी मिरवणूक म्हणजेच द्वार.
कालांतराने, जशी स्वातंत्र्याची लढाई पेट घेत गेली, तसतसे वाईतील गणेशोत्सवातील देखावे व मिरवणुका अधिक देशभक्तिपर व जनजागृती करणाऱ्या स्वरूपाच्या होऊ लागल्या. ही समृद्ध परंपरा आजही वाईकरांनी तितक्याच उत्साहाने व भक्तिभावाने जपली आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक अभिमान आणि देशभक्तीचा जिवंत पुरावा आहे.